
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात केलेल्या अचानक तपासणीत जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा याच्याकडून यापूर्वीच्या आणि आताच्या गुह्यात वापरलेले मोबाईल आणि सीम कार्ड मिळाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
एक मोबाईल आणि सीम कार्ड 22 मार्चच्या धमकी प्रकरणात वापरले आहेत, तर एक सीम कार्ड 14 जानेवारी रोजी वापरलेल्या धमकी प्रकरणातील आहे. आरोपीला ट्रान्झिट वॉरंटवर नागपुरात आणण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गडकरींना धमकी देण्यासाठी एका तरुणीच्या मोबाईलचा उपयोग करण्यात आला होता. तिची विचारपूस केली असता कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तुरुंगात कडेकोट सुरक्षा असताना गुन्हेगाराला फोन व सीमकार्ड मिळते हे गंभीर आहे. आम्ही स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली आहे, असे ते म्हणाले.