देशातील शेतकरी आणि मजूर दु:खी, गडकरी उघड बोलले

देशात रस्ते चांगले नाहीत, रुग्णालये, स्वच्छ पाणी, शाळा चांगल्या नाहीत. या देशातील शेतकरी आणि मजूर आज अत्यंत दुःखी आहे. विकास झालाय, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे, अशा कडक शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी मोदी सरकारच्या विकासाचा भंडाफोड केला. पंजाब, हरयाणातील शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर छेडलेल्या आंदोलनाबाबत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा शेतकरी, शेतमजुरांची विदारक स्थितीच त्यांनी मांडली.

तांदूळ, मका, साखर, गव्हाचे अतिरिक्त उत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हरयाणात तर गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी अक्षरशः रेल्वेचे प्लॅटफॉर्म वापरावे लागत आहेत. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. शेतमालाचा भाव मागणी आणि पुरवठय़ावर ठरतो. पण आपल्याकडे धान्याच्या किमतीत फारसा बदल होत नाही. त्यामुळे शेती आर्थिकदृष्टय़ा परवडेनाशी झाली आहे. या देशाचा शेतकरी फक्त अन्नदाता असू नये तो ऊर्जा उत्पादकही व्हावा हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे, असे गडकरी म्हणाले.

देशात अनेक समस्या
देशात अनेक समस्या आहेत. आज गावोगावी जल, जमीन, जंगल, जनावर आणि ग्रामीण शेतीची अवस्था अत्यंत वाईट आहे. आदिवासी पाडे, ग्रामीण भागात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱयांच्या उत्पादनांना हमीभाव, चांगले दर मिळत नाहीत, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी देशातील नेमक्या समस्यांवर बोट ठेवले.