महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारांची उडी

23

सामना प्रतिनिधी । मुंबई

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलेले आमंत्रण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्विकारले आहे. नीतीश कुमार यांनी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात येण्याचे मान्य केले असून शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनात साथ देण्याचेही मान्य केले आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची पटना येथे आमदार कपिल पाटील यांच्यांसह नुकतीच भेट घेतली. बिहार सरकारचे शेतकरी धोरण आणि सात योजनांचे राजू शेट्टी यांनी कौतुक केले. नीतीश कुमार मुख्यमंत्री झाल्यापासून बिहारमध्ये एकाही शेतकऱ्यांने आत्महत्या केलेली नाही, याचेही शेट्टी यांनी कौतुक केले. देशभरातील सर्व शेतकरी नेते ७ जुलैपासून देशव्यापी किसान यात्रा सुरु करत आहेत. मध्यप्रदेशातील मंदसौर येथून यात्रा सुरु होणार असून चंपारण येथे त्याचा समारोप होणार आहे. यात्रेचा समारोप नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या अमंलबजावणीत केंद्राचा वाटा हवा

स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी केंद्राने आश्वासन दिल्याप्रमाणे अमलात आणल्या पाहिजेत पण त्याचबरोबर उत्पादन खर्चातला काही भाग केंद्र सरकारने उचलला पाहिजे, यावर दोघांचेही एकमत झाले. देशातला शेतकरी संकटात आहे. कारण कृषी क्षेत्रच संकटात सापडले आहे. उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही आणि तितका भाव मिळत नाही, ही खरी अडचण आहे. उत्पादन खर्चाचा काही भाग केंद्र सरकारने उचलला पाहिजे तरच या प्रश्नाची कोंडी फुटेल असे नीतीश कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या