हभप निवृत्ती महाराज वक्ते

637

राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱया यंदाच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हभप निवृत्ती महाराज वक्ते यांची झालेली निवड उचितच म्हणायला हवी. संत साहित्यविषयक लेखन करणे आणि मानवतावादी कार्यासाठी वक्ते महाराजांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे. निवृत्ती महाराजांचा जन्म ३० ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. वारकरी संप्रदायाचे संस्कार बालपणातच झाले. बालवयातच संतसाहित्यविषयक आवड त्यांच्यात निर्माण झाली. नऊ वर्षांचे असतानाच पंढरीच्या वारीचे आकर्षण निर्माण झाले. संत मुक्ताबाई आणि पंढरीची वारी ते आपल्या कुटुंबीयांसोबत करू लागले. प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना त्यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पाठांतर केले. १९५४ ते ५८ या काळात साखरे महाराजांच्या मठात नीळकंठ प्रभाकर मोडक या गुरूंकडे अध्ययन केले. अभ्यास चिंतनाच्या प्रवासात वक्ते महाराजांना हभप परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळशास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदी संत-महात्म्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, पुराण, स्मृतीग्रंथ पुराण आदी ग्रंथांचा पंढरपुरात केला. चातुर्मासाच्या काळात त्यांचे अध्ययन सुरूच असते. संतसाहित्याचा उत्तम संस्कार त्यांच्या लेखनात उमटला. विठ्ठलभक्तीचा प्रत्ययही त्यांच्या अनेक संपादित ग्रंथांत आपल्याला आढळून येतो. ‘विठ्ठल कवच’, ‘विठ्ठल सहस्रनाम’, ‘विठ्ठल स्तवराज’, ‘विठ्ठल अष्टोत्तर नाम’ आणि ‘विठ्ठल हृदय’ या संपादित ग्रंथांची नामावली बघितली तर लेखन संपादनात प्रतिबिंबीत झालेली विठ्ठलभक्ती दिसते. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई, ‘ज्ञानेश्वर दिग्विजय’, ‘वाल्मीकी रामायण’, ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन’ अशा ग्रंथांचे त्यांनी केलेले साक्षेपी संपादन अभ्यासकांसाठी आजही महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या