निजामविरोधी लढय़ातील योद्धय़ांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा द्या, प्रा. डॉ. जी.के. डोंगरगावकर यांची मागणी

मराठवाडय़ातील जुलमी निजामी राजवटीविरोधात उठाव करणाऱ्या योद्धय़ांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेतला. त्यामुळे आता गेल्या कित्येक वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या मराठवाडय़ातील योद्धय़ांचे प्रलंबित प्रश्नही सरकारने तातडीने सोडवावेत, अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली.

17 सप्टेंबर रोजी 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राज्यभरात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने प्रा. डॉ. डोंगरगावकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मराठवाडय़ातील जनतेच्या मागण्या सादर केल्या आहेत.
निजामविरोधी लढय़ातील योद्धय़ांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्याची मागणी 1980 सालीच राज्य सरकारने मान्य केली आहे, पण निजामाच्या शरणागतीनंतरही त्याचे खासगी सैन्य असलेले रझाकार आणि त्या राजवटीची चाकरी करणारे जहागीरदार, पटवारी, दिवाण हे मोठय़ा संख्येने मराठवाडय़ात कायम होते. ते आपल्यावर सूड उगवतील या भीतीने त्या काळात बऱ्याच योद्धय़ांनी आपली ओळख लपवली. तसेच अनेक योद्धय़ांनी मूळ गावे सोडून अन्यत्र स्थलांतर केले. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या दर्जापासून वंचित राहावे लागले असून त्यांचे प्रश्न आजवर प्रलंबित आहेत, असे डॉ. डोंगरगावकर यांनी सांगितले.

स्मारक समितीच्या मागण्या

  • मराठवाडय़ात मॅट्रिकनंतरच्या शिक्षणाचे माध्यम सक्तीने इंग्रजी करण्यात यावे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ येथे नवे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत.
  • इंग्रजीसह विदेशी भाषांचा अनुवाद करण्याचे प्रशिक्षण/ प्रकाशन केंद्र स्थापन करावे.
  • अंजिठा लेणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन- प्रशिक्षण संस्थेला आणि पाली भाषा विद्यापीठाला मान्यता द्यावी.
  • मराठवाडय़ातून 1972 पासून रोजीरोटीसाठी मुंबईत स्थलांतरित झालेल्या लोकांना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात परवडणारी घरे द्यावीत.

स्वातंत्र्यसैनिकांच्या शिक्षण संस्थेला पाच एकर जागा द्या

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी चार दशके चालविलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळ या एकमेव शिक्षण संस्थेला सिडको-म्हाडाद्वारे नवी विशेष बाब म्हणून मुंबईत पाच एकर जागा देण्यात यावी तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 कोटींचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही संस्था गेली 20 वर्षे रायगड जिह्यात कार्यरत असून संस्थेचे नवी मुंबईतील सत्याग्रह कॉलेज हे नामांकित आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या