दिल्ली दंगलींचा आणि निजामुद्दीन मरजकचा संबंध आहे? पोलिसांचा कसून तपास सुरू

993

दिल्लीमध्ये भडकलेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. या हिंसाचाराचा संबंध निझामुद्दीन इथल्या मरकझशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. दंगलीमध्ये ज्या शाळेच्या गच्चीवरून अॅसिड बॉम्ब फेकण्यात आले होते, त्या शाळेचा मालक हा सातत्याने मरकझमध्ये प्रमुख लोकांशी संपर्कात होता असे तपासादरम्यान कळाले आहे. दंगलीच्या एक दिवस आधी शाळेचा मालक देवबंदलाही जाऊन आल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अंकीत शर्मा यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. जमावाने त्यांना ठेचून ठार मारले होते. या हत्येप्रकरणी ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आलेला नगरसेवक ताहीर खान याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. बुधवारी पोलिसांनी शाळेच्या गच्चीवरून झालेला हल्ला आणि अंकीत शर्मा खूनप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

दिल्लीच्या उत्तरेकडच्या भागात असलेल्या दयालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजधानी शाळा आहे. या शाळेवर एक मोठी बेचकी बसवण्यात आली होती. या बेचकीच्या सहाय्याने दगड आणि अॅसिड बॉम्बचा मारा केला जात होता. ज्या शाळेवरून हा मारा केला जात होता ती शाळा फैजल फारूख नावाच्या व्यक्तीची आहे. पोलिसांनी त्याच्यासह याप्रकरणी 18 जणांना अटक केली आहे. दिल्लीतील दंगलींमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला होता तर 155 जण जखमी झाले होते.

फैजल फारूखचे पीएफआय या संघटनेशी संबंध असल्याचे पोलिसांना कळाले आहे. नव्याने उजेडात आलेल्या माहितीनुसार फैजल आणि मरकजच्या प्रमुख नेत्यांमध्ये संभाषण झाले होते आणि तो दंगलीच्या एक दिवस आधी देवबंद इथेही जाऊन आला होता. या गोष्टी निव्वळ योगायोगातून घडलेल्या नाहीत असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी दंगलीमध्ये मरकझचा काही संबंध आहे का हे देखील तपासायला सुरुवात केली आहे.

24 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये CAA विरोधाच्या नावाखाली हिंसाचार उसळला होता. दंगेखोरांनी खजुरी खास येथील ताहीर हुसैन याचे घर आणि नंतर राजधानी शाळेला आपले केंद्र बनविले होते. शाळेच्या छतावर आधीपासूनच दगड, काचेच्या बाटल्या पेट्रोल बॉम्बची तयारी करून ठेवण्यात आली होती. राजधानी शाळेच्या मालकाचे आणि जवळच असलेल्या एका शाळेच्या मालकामध्ये वैमनस्य होते. दंगलीआडून फैजल फारूखने प्रतिस्पर्ध्याचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या