मरण्यासाठी मशिदीहून चांगली जागा नाही, तबलिगी जमातच्या मौलवीची ऑडिओ क्लिप व्हायरल

5330

दिल्लीतील निजामुद्दीन भागामध्ये असलेल्या मुसलमानांच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी देशविदेशातून अनेक मुसलमान एकत्र आले होते. या ठिकाणी अनेकांना कोरोनाची लागण झाली असून हे सगळे जण आपापल्या भागात परतल्याने त्यांच्या मार्फत अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान येथील एका मौलवीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं वृत्त आहे. या क्लिपमध्ये मौलवी मरण्यासाठी मशिदीहून उत्तम जागा नसल्याचं म्हणत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मरकज नावाच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये मुसलमानांच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी देशविदेशातून अनेक मुसलमान एकत्र आले होते. तबलिगी जमातचे तब्बल 1500 लोक या कार्यक्रमात अडकून पडल्याचा दावा करत आहेत. मात्र, तेथील साद नावाच्या मौलवीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात मरण्यासाठी मशिदीहून चांगली जागा असू शकत नाही, असं म्हटलं आहे.

मौलवी सादच्या या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कोरोनाचा संदर्भ आल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. ”मशिदीत एकत्र जमल्याने रोगाचा संसर्ग होतो, हे मानणं चूक आहे. मी म्हणतो की, जर मशिदीत येऊन एखादा माणूस मृत्यू पावत असेल तर त्यापेक्षा चांगली जागा अन्य कोणतीच नसेल. अल्लाहवर भरवसा करा. तुम्ही वर्तमानपत्र वाचता पण कुराण वाचत नाही आणि घाबरता. जर कुणी संसर्ग वाढेल म्हणून मशीद बंद करा असं सांगत असेल तर हा विचार तुम्ही मनातून काढून टाका”, असं या ऑडिओमध्ये असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या भाषणावेळी अनेक जणांचे खोकल्याचे आवाज येत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

दिल्लीत तबलिगी जमाततर्फे झालेल्या या मरकजमधल्या किमान 10 जणांचा देशाच्या विविध भागात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि कोरोनाची लागण झालेले 93 जण देशभरात सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या