मरकजहून परतलेल्या मुस्लिमांना नांदेड, परभणी व संभाजीनगरात क्वॉरंटाईन करून स्वॅब घेतले!

6109

दिल्ली शहरातील निजामुद्दीन येथे तबलिग जमातच्या मरकजसाठी जाऊन परत आलेल्या मराठवाड्यातील मुस्लीमांना महसुल, आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाईन करून ठेवणे सुरू केले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागात तबलिगी जमातची मरकज (सभा) झाली. यात सामील झालेल्या मुस्लीमांना कोरोना रोगाची लागण होऊ शकते हे लक्षात घेऊन देशभरात आपापल्या जिल्ह्यात मरकजहून परतणाऱ्या प्रत्येक तबलिगीला ते आहेत तिथेच क्वारंटाईन करणे व त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम देशभर हाती घेण्यात आली आहे. या मरकजमध्ये महाराष्ट्रातील दिडशेहून अधिक जण सहभागी झाले होते. त्यापैकी नगरमधील दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आल्याने मोठी खळबळ निर्माण झालेली आहे.

प्राप्त माहितीनुसार या मरकजसाठी मराठवाड्यातील संभाजीनगर येथून 4 जण, नांदेड जिल्ह्यातील 14 जण तर परभणी जिल्ह्यातील तीन जण असे एकुण 20 जण मरकजला गेले होते असे सांगण्यात येते.

संभाजीनगरातून मरकजला फक्त चौघे गेले
प्रत्यक्षात संभाजीनगरातील 47 जणांपैकी चार जण 29 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या मरकजला गेलेले असून ते 29 एप्रिल रोजी परत येणार आहेत. या चौघांची दिल्लीतच आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असल्याचे सांगण्यात आले.

नांदेडमधून 13 जण
दिल्लीतल्या निझामुद्दीतन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये नांदेड जिल्ह्यातील 13 जण सामील होते, 3 आठवड्यापुर्वी ते नांदेड जिल्ह्यात परतले. त्यापैकी 8 जणांना रात्री नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले.यापैकी 2 जण हिमायतनगर तालुक्यातील तर 6 जण नांदेड शहरातील आहेत. अन्य दोघे लातूर आणि पुण्याहून आले होते. त्यांनाही तेथेच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे नमुने आज पुण्याला पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

परभणीचे तिघे जिल्हा रूग्णालयात
याचप्रमाणे तबलिग जमातच्या मरकजसाठी जाऊन परतलेल्या पूर्णा येथील दोन व परभणी शहरातील एक अशा तिघांना परभणीच्या जिल्हा रूग्णालयाच्या संसर्गजन्य प्रतिबंधक वार्डात अ‍ॅडमिट करण्यात आलेले आहे. त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून ते पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. स्वॅबचे अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या