‘बीएसडी’ आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ, वाचा सविस्तर बातमी

2677

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा कोणतीही इतर ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खरेदीत मोठी सवलती देतात. या वेबसाईट सणासुदीच्या काळातच नाही, तर ऑफ सिजनमध्ये ही आपल्या वेबसाईटवर खरेदीसाठी चांगल्या ऑफर्स देतात. यामुळेच आता मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन शॉपिंगला पसंती देत आहेत. काही लोक अधूनमधून ऑनलाइन खरेदी करतात. तर यामध्ये काही लोक असे ही आहेत ज्यांना गरज नसताना ही सतत ऑनलाईन खरेदी करण्याची सवय लागली आहे. तज्ज्ञांच्या मते ऑनलाइन शॉपिंगची ही सवय एक प्रकारचा मानसिक आजार आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र काही लोक ‘बाईंग शॉपिंग डिसऑर्डर’ (बीएसडी) म्हणजेच ऑनलाईन शॉपिंगच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार करत आहेत. अशाच 122 लोकांवर जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यातील 34 टक्के लोकांना ऑनलाईन शॉपिंगचे व्यसन असल्याचे समोर आले. ज्यामुळे त्यांच्यात चिंता किंवा नैराश्याची लक्षण देखील दिसून येत होती. जर्मनीतील हॅनोवर मेडिकल शाळेच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हीच वेळ आहे की आता बाईंग शॉपिंग डिसऑर्डर या आजाराची वेगळी वर्गवारी केली पाहिजे. याचा स्वतंत्र मानसिक आजाराच्या यादीत समावेश करून याबाबत अधिक माहिती गोळा केली पाहिजे.

20 मधील 1 व्यक्तीस आहे बीएसडी 

Comprehensive Psychiatry या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, विकसित देशांतील सुमारे 50 टक्के लोकांना शॉपिंग डिसऑर्डर किंवा बीएसडी हा आजार आहे. जगभरात दर 20 लोकांपैकी १ व्यक्तीला हा आजार आहे. तसेच प्रत्येक 3 जणांपैकी 1 व्यक्तीला ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन लागलेले आहे. संशोधकांच्या मते, बीएसडी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खरेदी करण्याची तीव्र इच्छा होते. या आजाराने ग्रस्त व्यक्ती आपल्याला न परवडणाऱ्या वस्तूंची ही खरेदी करू लागतो. यामुळे अनेक वेळा त्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

संशोधकांना आशा आहे की, हे संशोधन आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्य तज्ज्ञांना प्रोत्साहित करतील आणि ते बीएसडीच्या या स्थितीबद्दल अधिक माहिती गोळा करतील. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने याची मानसिक आरोग्य स्थितीच्या आजारात वर्गवारी केलेली नाही. असे असले तरी संस्थेने व्हिडिओ गेम आणि जुगार खेळणे याला मानसिक आजाराच्या यादीत ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या