अर्णबसह रिपब्लिकच्या कर्मचाऱयांवर 16 मार्चपर्यंत कारवाई करणार नाही! हायकोर्टात मुंबई पोलिसांची माहिती

टीआरपी घोटाळाप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीसह ज्या कर्मचाऱयांची नावे चार्जशीटवर आहेत अशा रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱयांवर 16 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.

टीआरपी घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत रिपब्लिक टीव्हीचा पत्रकार अर्णब गोस्वामी आणि आऊटलियर मीडिया कंपनीच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली. त्यावेळी सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले की, 16 मार्चपर्यंत कोणावरही कठोर कारवाई करणार नाही.

अलिबाग न्यायालयात हजर न राहण्याची मुभा

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी याने अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयात 10 मार्च रोजी होणाऱया खटल्यादरम्यान हजर राहण्याची सक्ती करू नये, अशी विनंती ऍड. संजोग परब यांच्यामार्फत हायकोर्टाला केली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने अर्णबची विनंती मान्य करत 16 एप्रिलपर्यंत त्याला न्यायालयात स्वतः हजर न राहण्याची मुभा दिली.

आपली प्रतिक्रिया द्या