घाटीत रक्ताचा तुटवडा, रक्तपेढीकडून मात्र लूट

27

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

घाटी रुग्णालयात उन्हाळ्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत शंभरपेक्षा कमी रक्त घटकांचा साठा शिल्लक असून, तो दोन दिवस पुरेल एवढाच आहे. घाटीत रक्ताची मोठी गरज असल्याने दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्याची गरज असतानाही रक्तपेढी यंत्रणा ढाराढूर झोपेत आहे. दुसरीकडे दानात आलेल्या रक्ताच्या कार्डांची विक्री करून पैसे कमावण्याचा गोरखधंदा कर्मचाऱ्यांनीच सुरू केल्याने घाटीचे कुंपणच शेत खात असल्याची प्रचिती बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना येत असून, वेळप्रसंगी रक्ताची मागणी करणाऱ्या गरजवंतांवर कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

घाटी रुग्णालयात अकराशे खाटांची व्यवस्था आहे. तेथे दररोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होतात. मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणांहून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अपघात, आपत्कालीन स्थितीत आलेल्या रुग्णांना तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांना दरदिवशी ७० ते ८० रक्ताच्या बाटल्यांची आवश्यकता असते.

प्रदेशातील सामान्यांचा मोठा आधार असलेल्या गरिबांच्या घाटी रुग्णालयात चार दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आता उपलब्ध आहे. रक्त मिळविण्यासाठी ‘जनसंपर्काद्वारे’ प्रयत्न करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्डधारकांकडूनही नियम डावलून पैसे घेऊन रक्त देण्यात येते. घाटीतर्फे घेण्यात येणाऱ्या शिबिरात दात्यांना रक्तदान कार्ड देणे गरजेचे आहे. परंतु, अनेकदा हे कार्ड दात्यांना दिले जात नाही. हेच कार्ड काही कर्मचाऱ्यांनी गरजवंतांना विकून पैसे कमावण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या गोरखधंद्यात एक साखळी कार्यरत असून, ही टोळी सामूहिकपणे गरजवंतांची लूट करीत आहे. खासगी रक्तपेढीपेक्षा कमी किमतीत रक्त मिळत असल्याने गरजवंतही टोळीकडून कार्ड घेऊन रक्त मिळवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबद्दल रक्तपेढी प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या