रत्नागिरीत ५० दिवसानंतरही ५००च्या नोटा गायबच

सामना ऑनलाईन। रत्नागिरी

लाईक करा, ट्विट करा

५०० आणि १००० च्या नोटाबंदी होऊन ५० दिवस उलटले तरी रत्नागिरीकरांना अद्यापही ५०० रुपयांच्या नव्या नोटांची प्रतिक्षाच लागली आहे. नोटाबंदीमुळे अनेकठिकाणी उडालेला गोंधळ ५० दिवसांनंतरही कायम आहे. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर १० नोव्हेंबरपासून नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागल्या. नोटाबंदीनंतर बँकांची एटीएम सुविधाही कोलमडली. १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवू लागला. २००० रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या तरी सुट्टे पैसे कोण देणार हा यक्षप्रश्न नागरीकांना पडला. सुरुवातीला एटीएमच्या बाहेर लागलेल्या रांगा अखेर एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे बंद झाल्या.

२००० रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटाही व्यवहारात आल्या. मात्र रत्नागिरीकरांना ५० दिवस उलटले तरी ५०० रुपयांच्या या नव्या नोटांची प्रतिक्षाच लागली आहे. ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होत नसल्याने सुट्टय़ा पैशांअभावी बाजारपेठांमध्येही त्याचा विपरित परिणाम झाला.