‘अविश्वास प्रस्तावानं मोदींचे मौन तोडायचं आहे’; काँग्रेसच्या गौरव गोगोईंनी स्पष्टच सांगितलं

congress-communist-gaurav-gogoi

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील अविश्वास ठरावाबाबत लोकसभेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याऐवजी गौरव गोगोई यांनी मांडल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. काही मिनिटांतच नाव बदलले, असे काय झाले, असा सवाल भाजप खासदारांनी केला. यावर गौरव गोगोई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितलं की, तुमच्या कार्यालयात काय झालं, ते आम्हाला सांगा. यानंतर त्यांनी आरोप केला की, पीएम मोदी तुमच्या कार्यालयात काय बोलले ते आम्ही सांगू का? या वक्तव्यावर अमित शहा संतापले. ते म्हणाले की, गौरव गोगोई यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधानांनी काय सांगितलं ते त्यांनी सांगावं. यावक्तव्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी गोगोई यांना सांगितलं की, अशी विधानं कधीही करू नये ज्यात तथ्य नाही.

यानंतर गौरव गोगोई यांनी आपलं मत सभागृहात स्पष्ट शब्दात मांडलं.

अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय उरला नाही, आपली मजबुरी आहे. हा प्रस्ताव आम्ही मणिपूरसाठी आणला आहे. मणिपूरचे तरुण न्याय मागत आहेत. मणिपूरची कन्या न्याय मागत आहे. मणिपूरचा शेतकरी न्याय मागतो आहे. मणिपूरला फटका बसला तर हिंदुस्थानलाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. हिंदुस्थान विषयी बोलणे म्हणजे या दु:खाच्या वेळी संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे असा संदेश जाईल. हीच आमची अपेक्षा होती पण तसे झाले नाही’.

‘देशाचे प्रमुख असल्याने पंतप्रधानांनी सभागृहात यावं. त्यांचा मुद्दा मांडावा. शोक व्यक्त करावा आणि सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि या दु:खाच्या वेळी संपूर्ण सभागृह सोबत आहे असा संदेश मणिपूरला गेला पाहिजे’, असा विचार त्यांनी मांडला. त्यासोबत आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे, पण तसे झाले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

पंतप्रधान लोकसभेत काहीही बोलणार नाही आणि राज्यसभेतही काही बोलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे आम्हाला अविश्वास ठराव आणून पंतप्रधान मोदींचं मौन तोडायचं आहे. आम्‍हाला विचारायचं आहे की मणिपूर हिंसाचारावर ते आत्तापर्यंत काहीही का बोलले नाहीत, असं गोगोई म्हणाले.