मुंबई, ठाणे,नवी मुंबई,पनवेलमधील हजारो गृहप्रकल्प रखडणार, वाचा महत्वाची बातमी

सामना ऑनलाईन, नवी मुंबई

ठाणे खाडी ही फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या खाडीच्या दहा किमी क्षेत्रात राज्य वन्यजीव मंडळ आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांच्या परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तशी अधिसूचनाच वनविभागाच्या कुर्ला येथील मुख्यालयातून दोन दिवसांपूर्वी जारी करण्यात आला आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील निवासी व व्यापारी संकुलांच्या बांधकामांना मोठा ब्रेक लागणार असून हजारो गृहप्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

ठाणे खाडीत मुबलक अन्न मिळते म्हणून हजारो किमी प्रवास करून येणारे फ्लेमिंगो पक्षी येथे पायउतार होतात. ऑक्टोबर ते मार्च या काळात ठाणे खाडी फ्लेमिंगोच्या गर्दीने भरून गेलेली असते. म्हणूनच राज्य सरकारने ठाणे खाडी ही फ्लेमिंगोचे अभयारण्य म्हणून ऑक्टोबर 2017 मध्ये जाहीर केले. या अभयारण्याच्या सभोवतालचा भाग राज्य सरकार जोपर्यंत संवेदनशील क्षेत्र निश्चित करत नाही तोपर्यंत ठाणे खाडीच्या किनाऱ्यापासून 10 किमीच्या परिसरात वनविभागाची कामे सोडून दुसरी कोणतीही कामे करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळ आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांच्या स्थायी समितीची परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑक्टोबर 2018 रोजी दिले होते. त्यानुसार विभागीय वनाधिकारी कार्यालयाने दोन दिवसांपूर्वी तशी अधिसूचना जारी केली आहे.

रिअल इस्टेट चिंतेत

खाडीच्या दहा किलोमीटर परिसरात वनविभागाची कामे वगळता इतर कोणत्याही बांधकामांना केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळाच्या परवानगीशिवाय बांधकामे करण्यास परवानगी देऊ नये या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. या अध्यादेशामुळे मानखुर्द, भांडुपपासून ठाणे, कळवा, नवी मुंबई ते थेट पनवेलपर्यंतचे हजारो गृहप्रकल्प रखडणार असल्याने आधीच आर्थिक मंदीच्या कचाटय़ात सापडलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.