कोल्हापूरचे ‘ते’ 21 जण दिल्लीत सुरक्षित, एकालाही कोरोनाची लागण नाही – गनी आजरेकर

648

शीतल धनवडे

तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुर जिल्ह्यातील ‘ते’ 21 बांधव दिल्ली मध्येच सुरक्षित आहेत. लॉकडाउन संपल्यानंतरच ते परतणार असून, यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. येथे परत आल्यानंतरही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर यानी दैनिक सामनाशी बोलताना केले आहे. तर यासंदर्भात कोणीही काळजी करू नये अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

देशविदेश आणि 19 राज्यातून दिल्लीत निजामुद्दीन परिसरात आयोजित तबलीगीला सुमारे अडीच हजारहून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित होते. जनता कर्फ्यु तसेच दिल्ली पाठोपाठ संपूर्ण देशच एकवीस दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात आल्याने, हे सर्वजण तेथेच अडकून पडले. यातील एक हजारहून अधिक त्यांच्या गावी परतले आहेत. काही अर्ध्या वाटेवर अडकले आहेत. तर एक हजाराहून अधिक निजामुद्दीन परिसरातच आहेत. यामधील आठ जणांचा कोरोना संसर्गाने झालेला मृत्यू. तसेच काही जणांना झालेली लागण यामुळे संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जण या कार्यक्रमाला गेल्याची माहिती समोर आली. या 21 जणांचा ठावठिकाणा कोठे आहे? याची माहिती नसल्याने, सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू होऊन,सर्वजण धास्तावले होते. प्रशासनाकडूनही यासंदर्भात दुपारपर्यंत काहीच माहिती मिळत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

दरम्यान काही वृत्त वाहिन्यांनी दिल्लीत तबलीग जमातीत गेलेले कोल्हापुरातील 21 बांधव कोल्हापुरात आल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढला अशा आशयाच्या दिलेल्या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्या 21 जणांपैकी अनेकांशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत असल्याचे मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर यानी स्पष्ट केले.

लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतरच त्यांना येथे आणले जाणार आहे.येथे आल्यानंतरही पुन्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व चौदा दिवस क्वारण्टाइन करून, मगच घरी सोडले जाणार आहे. कोणीही याबाबत गैसमज करून घेऊ नये, असे आवाहन गनी आजरेकर यानी केले आहे. संबंधितांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी समाज स्वास्थ्य लक्षात घेऊन येथील मुस्लिम बांधवानीच पुढाकार घेऊन, मसजिद नमाज पठनासाठी बंद केल्या आहेत. दि.17 व 18 एप्रिल रोजी गगनबावडा येथे आयोजित इज्तेमा रदद् केला आहे. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी मुस्लिम बांधव नेहमीच सहकाऱ्याची भूमिका घेत आले आहेत, असेही गनी आजरेकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या