टीम इंडियाची ‘दिवाळी’, बीसीसीआय देणार ब्रेक

726

यंदा दिवाळीत मैदानाबाहेर फटाके फुटत असले तरी देशातील क्रिकेट मैदानावर मात्र चौकार, षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार नाही. कारण प्रकाशाच्या या सणात क्रिकेटशौकीन मैदानातील लढतींपेक्षा कुटुंबासोबत घरीच आनंद साजरा करणे अधिक पसंत करतात,असे लढतीचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स टीव्ही वाहिनीचे म्हणणे आहे. बीसीसीआयनेही स्टारचे म्हणणे ग्राह्य मानून दिवाळसणात कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढत न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचा हा निर्णय टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कुटुंबीयांना मोठा आनंद देणारा ठरणार आहे. कारण सतत घराबाहेर असणारे हिंदुस्थानी क्रिकेटर आता आपल्या प्रियजनांसोबत घरीच दिवाळीचा आनंद लुटू शकणार आहेत.

दिवाळसणात नागरिक दिवाळीची खरेदी आणि कुटुंबासोबत सण साजरा करणे अधिक पसंत करतात.त्यामुळे आंतरराष्ट्रीय लढतींसाठी जाहिरात देणाऱ्या पुरस्कर्त्यांचीही उणीव बीसीसीआयला भासू शकते हे स्टार टीव्हीचे म्हणणे बोर्डाने मान्य केले आहे. त्यामुळे या सणाच्या काळात कोणतीही आंतरराष्ट्रीय लढत आयोजित करण्यात आलेली नाही.दिवाळीचा पूर्ण आठवडाभर देशाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घरी राहून दिवाळी साजरा करण्याची सुवर्णसंधी या दिवाळीच्या सुट्टीमुळे मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी लढत पुणे येथे 23 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यानंतर थेट 3 नोव्हेंबरला टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध दिल्लीत टी-20 लढत खेळणार आहे. यंदा दिवाळी 27 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना यंदाची दिवाळी घरच्यांसोबत साजरी करण्याचा आनंद लुटण्याची मोठी संधी बोर्डाने दिली आहे.

नागरिकांना दिवाळीत स्वतःच्या कुटुंबासोबत घरी राहणे अधिक आवडते.त्यामुळे या काळात लढत बघायला स्टेडिअमवर येणाऱ्यांची संख्या रोडावते आणि लढतीचे प्रक्षेपण अथवा प्रसारणासाठी जाहिराती देणारे पुरस्कर्तेही कमी होतात हा स्टार टीव्हीचे मत मान्य करीत बोर्डाने क्रिकेटपटूंना दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. – बीसीसीआय

आपली प्रतिक्रिया द्या