‘दंगल’ झळकला नाही तरी चालेल पण राष्ट्रगीत कापणार नाही, आमीरचं पाकड्यांना उत्तर

44

सामना ऑनलाईन । मुंबई

उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्ताननं बॉलिवूड सिनेमांवर बंदी घातली होती. अखेर आर्थिक हालत दुबळी असलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानी सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय मागे घेतला, असं असलं तरी आमीरचा ‘दंगल’ सिनेमा मात्र प्रदर्शित झाला नाही. याचं कारण आता समोर आलं आहे.

‘दंगल’ सिनेमात हिंदुस्थानचं राष्ट्रगीत आणि तिरंगा दाखवण्यात आला आहे. ही दृश्य सिनेमातून वगळल्यासच सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी मिळेल असं पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या अनेक बड्या सिने वितरकांनी ‘दंगल’मध्ये रुची दाखवली होती. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाच्या अटीमुळे ‘दंगल’ सिनेमात प्रमुख कलाकार आणि सिनेमाचा निर्माता आमीरनेच हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.

प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने केलेली ही मागणी चुकीची असल्याचं आमीरचं मत होतं. सिनेमा आहे तसाच प्रदर्शित करण्यात यावा अन्यथा करू नये, असं त्यानं स्पष्ट सांगितलं होतं. असं असलं तरी पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख एम हसन यांच्या म्हणण्यानुसार, ‘हा निर्णय बोर्डाने एकमतानं घेतला नव्हता. तसंच कोणता सिनेमा दाखवायचा हे वितरकांवर ठरतं’.

खरंतर पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचं ऐकलं असतं तर कोट्यवधीची कमाई झाली असती. पण आम्हाला हे पाऊल उचलणं अधिक महत्वाचं वाटलं, असं या प्रवक्त्याने सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या