ब्रेकिंग : बंगालमध्ये प्रचारबंदी, हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाची अभूतपूर्व कारवाई

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी 24 तासांनी अर्थात एका दिवसाने घटवण्यात आला आहे. बंगालमध्ये परवाऐवजी उद्या रात्री दहानंतर ते लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

निवडणूक आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेत मुख्य सचिवा राजीव कुमार यांना हटवले आहे. त्यांची गृहमंत्रालामध्ये रवानगी करण्यात आली आहे. तसेच उद्या गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून कोणत्याही पक्षाच्या जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो घेता होणार नाही. हॉटेलवरील दारूविक्रीवरही बंदी लादण्यात आली असून सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यावरही निर्बंध लादले आहेत. निवडणूक आयोगाने कलम 324 चा वापर करून ही कारवाई केली आहे.

मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये मोठा गोंधळ झाला होता. तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शहांच्या रोड शोमध्ये जाळपोळ, दगडफेक करण्यात आली होती. यानंतर भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यात 9 जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी झालेल्या मतदानावेळीही भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.