भाजप हाऊसफुल; आता भरती बंद! मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेत घोषणा

67

सामना ऑनलाईन, अमरावती

भाजप कुणाच्याही मागे फिरत नाही. नेतेच आमच्यामागे फिरतात. भाजपमध्ये घ्या म्हणून गळ घालतात. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो. पण आता भाजप हाऊसफुल्ल झाला आहे, त्यामुळे भरती बंद! अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ आज अमरावती जिल्हय़ातील गुरुकुंज मोझरी येथे झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने कधीही कोणाला प्रवेशासाठी आग्रह केला नाही. नेतेच भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. मागे मागे  फिरतात. त्यापैकी जे चांगले आहेत, त्यांना आम्ही संधी देतो बाकीच्यांसाठी हाऊसफुल्ल! असे सांगतानाच त्यांनी आता भरती बंदचेही संकेत दिले.

आमच्या सरकारने पाच वर्षांत खूप काही केले असा दावा आपण करणार नाही पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवच्या सरकारपेक्षा निश्चितच जास्त कामे केली असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारने केलेल्या कामांची यादीच फडणवीस यांनी वाचून दाखवली.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती महापुरुषांचीही भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी कितीतरी नावे सांगता येतील. छत्रपती शिकाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच शिकसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही ही भूमी आहे. हीच परंपरा घेऊन राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार काम करत आहे. त्याचीच पावती या सरकारला आगामी निवडणुकीत विजयाच्या रूपाने मिळणार असल्याचा आत्मविश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

महाराष्ट्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या मगरमिठीत सापडला आहे. विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. पुढची पाच वर्षे दुष्काळ घालवण्यासाठीच खर्च करायची आहेत. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असा निर्धार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या