रिलायन्सचा दूरसंचार क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका

दूरसंचार क्षेत्रातील रोजगारांवरती सध्या मोठ्य़ा प्रमाणावर गदा आलेली असून रिलायन्स जिओच्या आगमनानंतर तब्बल ९० हजारांहून अधिक नोकऱ्या गमावण्याची वेळ नोकरदारांवर आलेली आहे. या प्रश्नाची आता सरकारनेदेखील गंभीर दखल घेतलेली असून सरकार स्वतःचा आता पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार सध्या दूरसंचार क्षेत्र कौशल्य परिषदेच्या मदतीने एक तीनस्तरीय कार्यक्रम राबवते आहे. यामध्ये दूरसंचार क्षेत्रात सर्वात खालच्या स्तरावरील कर्मचारी, ज्यांनी नोकरी गमावली आहे त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. भारत नेट आणि वाय-फाय क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी अधिक प्रमाणात निर्माण करण्यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. सरकारने ५जी तंत्रज्ञानासंदर्भात नेमलेली समितीदेखील लवकरच आपला अहवाल सरकार देणार असून या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाला अनेक क्षेत्रांत मोठी संधी निर्माण होणार असून रोजगार वाढीच्या निर्मितीलादेखील गती मिळणार आहे.

निवडणुकीत फेसबुकचा हस्तक्षेप नाही : हिंदुस्थान सरकारने फेसबुकला डाटा चोरीप्रकरणी पाठवलेल्या नव्या नोटिसीला फेसबुकने तत्परतेने उत्तर दिले असून सरकारला अनेक पातळ्य़ांवर विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटनच्या केंब्रिज एनालिटीकाने मात्र अजूनही या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. फेसबुकच्या माहितीची चोरी झाल्याच्या आणि त्याचा गैरवापर झाल्याचे समोर येताच सरकारतर्फे हिंदुस्थानी मतदार आणि त्यांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेसंदर्भात फेसबुक आणि केंब्रिज एनालिटिका या दोघांनाही नोटीस पाठवली होती, मात्र या दोघांच्याही उत्तरात विसंगती आढळल्याने त्यांना पुन्हा नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हिंदुस्थानी मतदारांच्या खासगी माहितीचा कुठलाही दुरुपयोग झालेला नाही आणि यापुढेदेखील तो होणार नाही अशी हमी फेसबुकने आपल्या उत्तरात दिली आहे. त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये फेसबुक पूर्णपणे प्रामाणिक वर्तन ठेवणार असून याची तयारी म्हणून अनेक फेक अकाऊंटस् नष्ट करणे, जाहिरातींची पारदर्शकता वाढवणे आणि अफवा पसवणाऱ्या फेक न्यूज थांबवणे असे उपाय सुरूदेखील केल्याचे नमूद केले आहे.