रत्नागिरीत मत्स्य दुष्काळाचे संकट : प्रदूषण आणि वातावरणातील बदल

60

सामना प्रतिनिधी । गुहागर

समुद्रात सातत्याने वाढत असलेले प्रदूषण आणि वातावरणात होत असलेला बदल याचा जोरदार फटका रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना बसला आहे. खोलवर समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना सध्या रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. यामुळे मच्छीमारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून अशीच स्थिती असल्याने यातून मार्ग कसा काढावा या चिंतेत मच्छीमार आहेत. दरम्यान, शासनाने या गंभीर स्थितीकडे लक्ष देऊन रत्नागिरी जिल्ह्यात ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांनी केली आहे.

मच्छीमारांनी जगायचे कसे…
१ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळय़ात मासेमारीला बंदी असल्याने अजून दोन महिने त्यांच्या उपजीविकेचे साधनच बंद असणार आहे. यंदा तर ऑक्टोबर व डिसेंबरमध्येही पाऊस पडला. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्य़ा कारणांमुळे मासेमारी करण्यावर अनेक बंधने आली होती. या नैसर्गिक आपत्तीत भर पडतेय ती जिल्ह्यातील कंपन्यांमधून केमिकलचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणावर मासळी मृत्युमुखी पडल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पावसाळा सुरू होताच माशांच्या उत्पत्तीचा काळ सुरू असल्याने मासेमारीस शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आलेली आहेच. त्यामुळे दोन महिने मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून असतात. त्यात बदलत्या हवामानामुळे वारंवार समुद्रात येणारे उधाण यामुळे मच्छिमारी करण्यास अडचणी येत असतात. माशांच्या प्रजननाच्या काळातच वातावरणात उलथापालथ झाल्याने समुद्रात मासळी मिळण्याचेही प्रमाण कमी झाले आहे. समुद्रात मोठी मासळीच मिळत नसल्यामुळे मच्छीमारांची आर्थिक घडीही विस्कटली आहे. हे आर्थिक संकट आल्याने जगायचे कसे हा प्रश्न मच्छीमारांसमोर पडला आहे. त्यात कर्ज काढून घेतलेल्या बोटी, मासेमारीसाठीचे साहित्य, खलाशांच्या पगाराचीही व्यवस्था अशा अनेक समस्यांना मच्छीमारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र सुकी मासळीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली असल्याचे विकेत्यांकडून सांगण्यात आले.

ओल्या मासळीचा हा दुष्काळ असाच वाढत राहिला तर मात्र मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासन मात्र या सगळय़ा बाबींकडे बघ्याची भूमिका घेत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष ठेवून मत्स्य दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

पर्यटनालाही फटका
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मच्छीमारांची तारांबळ उडाली. वेळणेश्वर, गुहागर, पालशेत परिसरात समुद्री उधाणाचा तडाखा बसला. ऐन पर्यटन हंगामातच पर्यटन व्यवसायाला फटका बसला. बंदर विभागाच्या वतीने मच्छीमार बांधवांनी तसेच जलक्रीडा व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. सुट्टी असल्याने पर्यटक बंदर, जेटी, किनारे परिसरात आले होते. बहुसंख्य मच्छीमारांच्या नौका दाभोळ, हर्णे बंदरात दोन दिवस विसावल्याचे मच्छीमार संस्थांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या