परभणीत मानव विकास योजनेतील निधी खर्चाला आखडता हात

42

सामना प्रतिनिधी । परभणी

जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक यंत्रणांनी उपलब्ध निधीच्या खर्चाचे विवरण दाखल न केल्याने हा निधी खर्चण्यास आखडता हात घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रत्येक आर्थिक वर्षात विविध योजनांमार्फत विकासकामे राबविण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. मानव विकास मिशन अंतर्गतही जिल्ह्यातील यंत्रणांना निधी वितरित केला जातो. शिक्षण, आरोग्य विभाग, बांधकाम विभागाला मानव विकासच्या माध्यमातून निधी दिला जातो. परंतु, हा निधी वेळेत खर्च होत नसल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मानव विकास मिशनअंतर्गत उपाययोजना केल्या जातात.

यासाठी आरोग्य विभागाला निधी उपलब्ध करुन दिला जातो. दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना प्रसुती काळात आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने मानव विकास मिशनच्या वतीने आरोग्य विभागाला निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी आरोग्य विभागाकडून लाभाथ्र्यांचे प्रस्ताव दाखल केले जातात. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य विभागाकडून काही प्रस्ताव येणे बाकी होते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी लाभार्थ्यांपर्यंत हे अनुदान पोहचले नाही. बुडीत मजुरीसाठी २ कोटी ३६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान मानव विकास मिशनने वितरित केले आहे. हेच प्रस्ताव जानेवारी महिन्यापर्यंत प्राप्त झाले असते तर गोरगरीब लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळाला असता. अभ्यासिकांचे प्रस्तावही उशिराने दाखल झाल्याने मार्च महिन्यातच यासाठी निधीचे वितरण करण्यात आले. निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रस्ताव वेळेत दाखल होत नसल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण विभागासाठी मानव विकास मिशनकडून निधी दिला जातो. ज्या गावांमध्ये वाहतूक व्यवस्था नाही, अशा गावातील पाच कि.मी. अंतरापर्यंतच्या शैक्षिणक प्रवासासाठी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले जाते. यासाठी मानव विकास मिशन मार्फत ३ हजार ७३८ विद्यार्थिनींसाठी १ कोटी १२ लाख १४ हजार रुपयांचा निधी विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. मात्र यासाठीही उशिराने प्रस्ताव आले आहेत.

उपकेंद्रांसाठी निधी
मानव विकास मिशन मार्फत आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी १ कोटी ५४ लाख ६५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. परंतु, या निधीतून उपकेंद्राच्या झालेल्या बांधकामा संदर्भात उपयोगिता प्रमाणपत्र मार्च अखेरही दाखल झालेले नाही. त्यामुळे निधी खर्चाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

३४ लाखांचे वाटप शिल्लक
मानव विकास मिशन अंतर्गत यावर्षी जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या निधीपैकी ३४ लाख ८७ हजार रुपयांच्या निधीचे वितरण २३ मार्चपर्यंत शिल्लक होते. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण निधी वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत मानव विकास मिशनअंतर्गत बससेवेसाठी ४ कोटी ५६ लाख ३३ हजार, बालभवन विज्ञान केंद्रांसाठी ५ कोटी ८७ लाख, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे पगार व निर्वाह भत्यापोटी १ कोटी ६ लाख ५५ हजार रुपये, आरोग्य शिबिरांसाठी १ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मानव विकास प्रकल्प जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राबविला जातो. परंतु, जर या योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर मानव विकास निर्देशांक कसा वाढेल, असा प्रश्न निर्माण हात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या