पुढला अध्यक्ष गांधी घराण्यातील नको असं राहुल गांधींच म्हणाले! गेहलोत यांचा गौप्यस्फोट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माहिती दिली की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गांधी घराण्यातील कोणीही पुढील पक्षाध्यक्ष होऊ नये, असे स्पष्ट केले होते’. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राहुल गांधींनी माहिती दिल्याचे सांगत गेहलोत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

शुक्रवारी केरळमध्ये माध्यमांना संबोधित करताना गेहलोत म्हणाले, ‘मी त्यांना (राहुल गांधींना) अनेक वेळा विनंती केली आहे की त्यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव स्वीकारावा. त्यांनी स्पष्ट केले की गांधी घराण्यातील कोणीही पुढील प्रमुख बनू नये.’

आपण लवकरच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता विरोधी पक्ष मजबूत होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे आगामी निवडणुकीत संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. देशभरातील काँग्रेस समित्या बैठका घेत आहेत ज्यात PCC आणि AICC संदर्भात ठराव मंजूर केला जात आहे.