मालवण पोलिसांच्या घराला लागली घरघर

10

सामना प्रतिनिधी। मालवण 

दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या मालवण पोलिसांच्या घरांनाच घरघर लागली असून ते राहत असलेल्या शासकीय वसाहतींमधील घराची दुरावस्था झाली आहे. यामुळे निम्म्याहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भाड्याने घर घेऊन राहण्याची वेळ आली आहे.

पोलीस वसाहतीचा सर्व्हे गृहनिर्माण विभागाकडून करण्यात आला . मात्र शासकीय भूखंडाचा नकाशा होणे बाकी असल्याने नवीन इमारत बांधकामासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागतं आहे.

मालवण शहरात रॉक गार्डनसारख्या पर्यटन स्थळानजिकच तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व न्यायालयाची इमारत आहे. याला लागूनच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत बांधण्यात आली आहे. चार ठिकाणी ४६ खोल्या असलेली भव्य वसाहत बांधली गेली, मात्र त्यातील २० खोल्यांच्या दोन वसाहती निर्लेखित करण्यात आल्या. तर समुद्राकडील बाजूस समोरासमोर असलेल्या दोन वसाहतीती २४ खोल्यांपैकी केवळ १६ खोल्यांमध्येच कर्मचारी राहत आहेत. पोलीस स्थानकाला लागूनच वसाहत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी निवासस्थानांसाठी ही सोयीस्कर आहे पण या इमारती मोडकळीस आल्या आहेत.

सीआरझेडची बंधने आणि राजकीय अनास्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काच्या वसाहतीपासून वंचित रहावे लागत आहे. पावसाळ्यात तर छप्पर गळतीची समस्या निर्माण होते. सुमारे ४० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारती जीर्ण झाले आहेत. येथील विहीर वापराविना असल्याने पाणीही पिण्यायोग्य नाही. शिवाय विहिरीत मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून पाणी क्षारयुक्त नसल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांनी सांगितले. वसाहतीला मालवण पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो, मात्र ते पाणीही अशुद्ध असल्याने केवळ कपडे अथवा भांडी धुण्यासाठीच वापर केला जातो. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या सर्व कुटुंबांना पाणी पिण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

पोलीस वसाहतीचा परिसर मोठा आहे. शासकीय जागेचा वापर योग्य रीतीने केल्यास सुसज्ज इमारत उभी राहू शकते. सीआरझेड कायद्यात शिथिलता मिळवून दिल्यास दुमजली इमारत तसेच लहान मुलासाठी मैदान, इमारतीतील खोल्यांचे क्षेत्र, शुध्द पाणीपुरवठा आदी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. शासन स्तरावरील आमदारांच्या समितीनेही वसाहतींची पाहणी करत खोल्या लहान असून दोन खोल्या मिळून एक खोली बनविण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र त्यावरही कार्यवाही न झाल्याने गेली कित्येक वर्षे अपुऱ्या खोलीत पोलीस कर्मचारी संसार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या