कोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख

कोरोनाचे जागतिक संकट रोखण्यासाठी लस बनवण्याचे काम सुरू असून क्लिनीकल चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या दोन तीन महिन्यात कोरोनाची लस बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) येणाऱ्या लसीबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे जगाची चिंता वाढली आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध देशांकडून लसीवर संशधन सुरू आहे. मात्र, या लस प्रभावीपणे काम करतील, याची खात्री नाही. तसेच या लसीच्या प्रभावाबाबत ठामपणे काहीही सांगू शकत नसल्याचे डब्लूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी मंगळवारी सांगितले.

या लसीवर काम सुरू असून या सर्व लस प्रथामिक टप्प्यात आहेत. त्या विकसीत करून त्यांची निर्मिती सुरू झाल्यानंतरही त्यात बदल आणि सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लस किती काम करतील, त्या किती यशस्वी होतील, याची कोणतीच हमी नसल्याचे टेड्रोस म्हणाले. चाचण्यांच्या टप्प्यांमध्ये जास्तीतजास्त सहभागींना लस द्यावी, त्यामुळे निष्कर्ष अचूक असतील आणि विकसीत केलेल्या लसीच्या प्रभाव आणि सुरक्षितता याची खात्री देता येईल, असे ते म्हणाले. विविध देशांमध्ये सुमारे 200 लसीवर संशोधन सुरू आहे.

आतापर्यंतच्या इतिहासानुसार एखाद्या रोगावर प्राथमिक टप्प्यात आलेल्या काही लस अयशस्वी होतात. त्यानंतर त्यात सुधारणा आणि बदल केल्यावर त्यांचा प्रभाव दिसतो. त्यामुळे कोरोना लसीबाबतही असेच घडण्याची शक्यता आहे. जागतिक देशांचा समूह आणि सीईपीआय यांच्यात लसनिर्मितीसाठी डब्लूएचओ समन्वय करत आहे. तसेच लस निर्माण झाल्यानंतर त्याच्या समान वितरणासाठी यंत्रणा आखण्यात आली आहे. त्यामुळे सर्वाधिक गरज असलेल्यांना वेळेत लस उपलब्ध होणार आहे. लस निर्माण करणे ही सहकार्याची प्रक्रिया आहे, यात चढाओढ किंवा स्पर्धा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लसनिर्मितीसाठी सर्व देशांनी एकत्र काम करण्याचे आवाहन टेड्रोस यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या