सिग्नलवर हॉर्न वाजवाल तर तेथेच रा‘हाल’!पोलिसांचा सिग्नलवर आवाजाचा ट्रॅप

नो हाँकिंगसाठी वाहतूक पोलिसांनी अनेक उपाय केले, परंतु मुंबईकर चालक त्याला दाद नेत नसल्याने कानठळ्या बसविणाऱया हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी हॉर्न वाजविणाऱयांवर नामी उतारा शेधून काढला आहे. सिग्नल लागलेला असताना जितका हॉर्न वाजविणार तितके चालकांना तेथेच लटकून राहावे लागणार आहे.

ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येत असली तरी अनेक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवितात. सिग्नल लागलेला असतानाही चालक हॉर्न वाजवतात. त्यामुळे पोलिसांनी चालकांची ही खोड मोडून काढण्यासाठी जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. आता सिग्नलवर स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी ‘डेसिबल मेजरिंग मीटर्स’ लावण्यात येणार आहेत. जर त्या मीटर्समध्ये हॉर्नचा आवाज 85 डेसिबलच्या वर गेला तर तो सिग्नल सुटण्याऐवजी पुन्हा त्याची वेळ वाढणार. सिग्नल सुटण्याची प्रतीक्षा करणे हे क्रमप्राप्त आहे. पण काही चालक विनाकारण कानठळ्या बसविणारे हॉर्न वाजवतात. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींना हे विनाकारण त्रासदायक ठरते. हे प्रकार थांबविण्यासाठी सिग्नललाच ‘डेसिबल मेजरिंग मीटर्स’ लावण्यात येणार आहे.

सध्या या ठिकाणी ‘डेसिबल मेजरिंग मीटर्स’
आजपासून प्रायोगिक तत्त्वावर शहरातील चार ठिकाणी ‘डेसिबल मेजरिंग मीटर्स’ सिग्नलला लावण्यात येणार आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शन, मरीन ड्राइव्ह, हिंदमाता आणि वांद्रे येथील एस. व्ही. रोडचा समावेश असेल असे सांगण्यात आले,

हॉर्नचा वापर प्रचंड तापदायक ठरत आहे. त्यामुळे हॉर्नचा वापर होऊ नये यासाठी हा उपाय हाती घेतला आहे. हॉर्न वाजविल्यास सिग्नलवरच लटकून राहावे लागेल या भीतीपोटी तरी चालक हॉर्न वाजविणार नाहीत. नागरिकांनी हॉर्न न वाजविणे आपली जबाबदारी असून त्याचे पालन केले पाहिजे.
– मुंबई वाहतूक पोलीस

आपली प्रतिक्रिया द्या