प्रधानमंत्री आवास योजनेने 14 मजुरांचे लाखो रुपये लटकवले

सामना प्रतिनिधी । शहापूर

उन्हातान्हात घरकुल योजनांवर राब राब राबलेल्या 14 मजुरांचे लाखो रुपये सरकारने लटकवल्याचा प्रकार शहापुरात उघडकीस आला आहे. संतापजनक म्हणजे आपली हक्काची मजुरी मिळावी यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात वारंवार खेटे मारूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या या बकवास कारभाराने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2016 – 17 मध्ये बंधू गायकवाड यासह 14 लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यात आली होती. मात्र ही घरकुले बांधण्यासाठी घाम गाळणाऱ्या 14 कामगारांची जवळपास अडीच लाखांची मजुरी थकवण्यात आली आहे. मजुरीची रक्कम प्रति लाभार्थी 18 हजार 90 याप्रमाणे सुमारे अडीच लाख इतकी आहे. ग्रामसेवक एल. एस. घायकट यांच्या निष्काळजीपणामुळे आमची फसवणूक झाल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा
मजुरांनी हजेरी पत्रकाच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधित ग्रामसेवकांकडे दिली होती. मात्र या घरकुल लाभार्थ्यांच्या हजेरी पत्रकाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ग्रामसेवकाने पार पाडली नाही. ग्रामसेवक घायकट यांच्या या निष्काळजीपणाचा फटका लाभार्थ्यांना बसला असून याबाबत बंधू गायकवाड यांसह 14 लाभार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.