रेल्वे अर्थसंकल्प ३ मिनिटांमध्ये संपला

59

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बुधवारी लोकसभेत २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर करताना त्यासोबत रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला. यावेळी पहिल्यांदाच सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर करण्यात येणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लक्ष होते. रेल्वेअर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेचा विकास या मुद्यांना प्राधान्य दिले. मात्र कोणत्याही नवी गाडीची अथवा रेल्वेमार्गाची घोषणा केली नसल्याने देशातील कोट्यवधी नागरिकांसह तिकिटांचे दर कमी होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांच्या पदरी निराशाच आली.

जेटली यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना २०१९ पर्यत देशातील सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये बायो टॉयलेट सुरु करण्याची घोषणा केली. याखेरीज प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी जाहिर केले. पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थस्थळ यात्रेकरीता विशेष एक्सप्रेस गाड्या रेल्वे सुरु करणार आहे. तर प्रवाशांनी ई तिकिट काढल्यास त्यावर सेवा कर आकारला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील नवीन मेट्रो रेल्वे योजनांतून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे जेटली यांनी सांगितले. देशातील २५ जुन्या रेल्वेस्थानकांचा कायपालट केला जाणार असून त्यासाठी जुन्या रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर (सरकते जिने), लिफ्ट बसवण्यात येणार आहेत.

देशातील दोन हजार रेल्वे स्थानकात सौर उर्जा प्रकल्प उभारुन  ती रेल्वे स्थानके उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली जाणार आहेत. याखेरीज रेल्वे कोच मित्र योजना, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे स्थानकांवर विशेष सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.  तसेच २०२० पर्यत चौकीदार विरहीत रेल्वे फाटक बंद करणार असल्याचे जेटली म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या