कश्मीर प्रश्नावर पाकिस्तान एकाकी; तुमचं तुम्हीच बघा, अमेरिकेने सुनावले

2586

कश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून धरत हिंदुस्थानवर दबाव आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान यांच्या अंगलट आला असून पाकिस्तान जगात एकाकी पडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिल्ला आहे. पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

जम्मूकश्मीरमधून कलम 370 हटविल्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने जगभर कागांवा केला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत या मुद्दय़ावरून हिंदुस्थानला घेरण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या या बैठकीपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांना फोन करून पाकिस्तानच्या बाजूने अमेरिकेने मतदान करावे यासाठी मनधरणी केली. पण ट्रम्प यांनी जम्मूकश्मीरच्या प्रश्नावर दोन्ही देशांतील तणाव कमी करायचा असेल आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर हिंदुस्थानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे.

पाकिस्तानने अमेरिकेसाठी काहीच केले नाही!

अमेरिका मागील काही वर्षांपासून पाकिस्तानला 1.3 अरब डॉलरची (नऊ हजार करोड) मदत करत आला आहे. त्यानंतरही पाकिस्तान सरकारने अमेरिकेसाठी काहीच केले नाही. आतापर्यंत पाकिस्तानची भूमिका ही अमेरिकाविरोधीच राहिली नसल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तामध्ये लपलेल्या  हक्कानी नेटवर्कवर पाकिस्तान कारवाई करत नसल्यामुळे मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात पेंटागॉनने 1.3 अरब डॉलरची मदत रोखली होती.

अमेरिकेकडून आर्थिक कोंडी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागच्या महिन्यात भेट झाली होती. या भेटीनंतर इम्रान खान यांनी ही भेट पाकिस्तानच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात या भेटीत असे काही घडलेच नाही, उलट पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत कमी करण्यात आली आहे. अमेरिकेने मदतीमध्ये 44 कोटी डॉलरची (3130 कोटी रुपये)कपात केली आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली आहे.
पाकिस्तान दहशतवादी कारवायांना प्रोस्तानहन देत असल्याच्या कारणावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळापासून यामध्ये कपात करण्यात आली होती. ट्रम्प प्रशासनाच्या काळात ही मदत पूर्णपणे रोखण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या