कर्जत कसारा प्रवाशांची ‘लटकंती’ सुरूच, एकही लोकल वाढवणार नाही

806

मध्य रेल्वेचा ठाण्याच्या पलीकडील प्रवास जीवघेणा झाला असल्याने कल्याण ते कर्जत-कसारा या मार्गावर लोकल फेर्‍या वाढविण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. असे असताना मध्य रेल्वेने या विभागात आधीच क्षमतेच्या 143 टक्के जादा लोकल फेर्‍या सुरू असल्याचे सांगत एकही नवी फेरी वाढविणे शक्य नसल्याचे उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मध्य रेल्वेने 2019चा प्रवासी सुविधांचा आढावा सादर केला असून त्यात एकूण उपनगरीय लोकल फेर्‍या 1772 वरून 1774 केल्याचे म्हटले आहे. तसेच 15 डब्यांच्या लोकलच्या रोजच्या फेर्‍या 16 वरून 22 पर्यंत वाढवल्याने प्रवासी क्षमतेत 25 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. सीएसएमटी ते वाशी-पनवेल हार्बर लाइनवर दररोज एकूण 614 फेर्‍या तर ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्स-हार्बर मार्गावर दररोज 262 फेर्‍या चालविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तर मुख्य मार्गावरील चालविण्यात येत असलेल्या एकूण फेर्‍या 856 वरून 858 पर्यंत वाढविल्या आहेत. तसेच दादर लोकलचा परळपर्यंत विस्तार करीत आता एकूण 38 परळ लोकल चालविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

कल्याण-कसारा तसेच कल्याण-कर्जत हा मध्य रेल्वेचा दुपदरी सेक्शन असून येथे लोकलसह  राजधानी, दुरांतो, प्रीमियम गाडय़ांसह सुपरफास्ट मेल-एक्स्प्रेस गाडय़ा तसेच मालगाडय़ा चालविल्या जातात, तर येथे लोकल फेर्‍या का वाढविल्या जात नाहीत, असा सवाल प्रवासी संघटनेचे मधू कोटीयन यांनी विभागीय रेल्वे उपयोगिता सल्लामसलत समितीच्या बैठकीत केला होता. कल्याण ते कर्जत सेक्शनमध्ये 216 तर कल्याण ते कसारा सेक्शनवर 150 लोकल फेर्‍या चालविण्यात येत आहेत; परंतु मेन्टेंनन्स ब्लॉकसह या सेक्शनची लाइन क्षमता 143 टक्के वापरली जात असल्याचे सांगत कल्याण ते कर्जत-कसारा सेक्शनमध्ये आणखी फेर्‍या चालविणे अशक्य असल्याचे मध्य रेल्वेने कोटीयन यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे भिजत घोंगडे अनेक वर्षे पडले असून पारसिकजवळ झोपडय़ांचा प्रश्न कायम आहे. राजकीय वरदहस्तामुळे रेल्वेमार्ग टाकणे कठीण बनत चालले आहे. त्यात कंत्राटदारांना द्यायला पैसे नसल्याने मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे काम थांबले आहे. – मधू कोटीयन,झेडआरयूसीसी सदस्य

आपली प्रतिक्रिया द्या