आता हेच बघायचं राहिलं होतं… अटल विकास यात्रेतून अटलजी गायब

सामना ऑनलाईन । रायपूर

दिवंगत माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने भाजप केवळ मते मागते, अटलजींविषयीची आस्था भाजपला नाही हे पुन्हा एकदा अवघ्या देशासमोर आले आहे. छत्तीसगडमधील डॉ. रमण सिंह सरकारने ‘अटल विकास यात्रा’ सुरू केली, मात्र पोस्टर्स, बॅनर्स आणि जाहिरातींमध्ये अटलजींचा फोटो छापलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हसतानाच्या मोठय़ा तसबिरी मात्र झळकल्या आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाच्या पूजन आणि दर्शनाचा कार्यक्रम देशभर झाला त्यावेळीही भाजप नेते, मंत्री गंभीर नव्हते. अस्थिकलशाचे दर्शन घेताना भाजप नेते हसण्यात आणि सेल्फी काढण्यात मग्न होते. याची छायाचित्रे अवघ्या देशाने पाहिली होती. आताही छत्तीसगडमधील भाजप सरकारकडून संतापजनक घटना घडली आहे.

भाजप ‘लाजधर्म’ही विसरला – काँग्रेस
अटलजींनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना राजधर्माचे पालन करण्याचा मंत्र दिला होता, मात्र भाजप आता ‘लाजधर्म’सुद्धा विसरला आहे. अस्थिकलश पूजनावेळी भाजपचे मंत्री हसत होते. आता अटलजींच्या नावाने काढलेल्या यात्रेत अटलजींचा फोटोही छापण्याचे साधे भानही भाजप नेत्यांना राहिले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी दिली आहे.

अमित शहांच्या हस्ते यात्रेचा प्रारंभ
– येत्या काही महिन्यांत छत्तीगड विधानसभेची निवडणूक आहे. हे डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी यात्रा सुरू केली आहे.
– पहिल्या टप्प्यात केवळ ‘विकास यात्रा’ असे नाव दिले होते.
– दुसऱया टप्प्यातील यात्रेला ‘अटल विकास यात्रा’ असे नाव देण्यात आले. डोगरगढ येथून यात्रेला प्रारंभ झाला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखविला.
– 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर अशी एक महिना ‘अटल विकास यात्रा’ चालणार आहे.
– आज ‘अटल विकास यात्रे’च्या उद्घाटन कार्यक्रमाचे जंगी आयोजन केले गेले. वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या गेल्या. पंतप्रधान मोदी, अमित शहा, रमन सिंह यांचे मोठे फोटो त्या जाहिरातींमध्ये आहेत पण अटलीजींचा फोटो नाही.
– पोस्टर्स, बॅनर्सवरही अटलजींचे छायाचित्र नाही.