आश्वासने पूर्ण होत नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प कशाला?

2060

पणजी, दि. 1 (प्रतिनिधी) – ‘‘मनाला वाटेल तेव्हा तुम्ही ‘मन की बात’ करता. गेल्या वर्षी जनतेला दिलेली आश्वासने अजून पूर्ण केली नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय? यासाठीच तुम्हाला बहुमत हवे आहे का?’’ असा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केला.

गोव्यातील पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर सडेतोड भाष्य केले. विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांनी देशाला लुबाडले. त्यांनी बुडवलेले कर्ज सरकारने नोटाबंदीमध्ये सर्वसामान्यांकडून भरून घेतले असे मी मानतो असे सांगतानाच नोटाबंदीमुळे जनतेला सोसावी लागणारी झळ कधीच भरून निघणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपा मनमानीपणे सरकार चालवतेय

मित्रपक्षांना विश्वासात न घेता लोकसभेतील बहुमताचा वापर करून भारतीय जनता पार्टी मनमानीपणे सरकार चालवतेय आणि महत्त्वाचे निर्णय घेताना मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही, असा सडेतोड आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. नोटाबंदीच्या निर्णयाचा दाखला त्यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारमध्ये भाजपाचे बहुमत आहे. शिवसेना त्यांच्या बरोबर आहे की नाही याची त्यांना काहीच पर्वा नाही. त्यामुळे ते वाटेल ते करू शकतात.’

…तर खुर्च्या सोडा

रेल्वेत नोकरी मागायला गेलेल्या मराठी तरुणांवर अमानुष लाठीमार करणाऱयांनो, तुम्हाला मराठी उमेदवारांना रोजीरोटी देता येत नसेल तर खुर्च्या सोडा, असेही त्यांनी आज केंद्र सरकारला ठणकावले. नवी दिल्ली येथे मराठी तरुणांवर झालेला लाठीमार हा निषेधार्ह आणि तितकाच संतापजनक असल्याचे सांगितले. मराठी तरुणांच्या रोजीरोटीची सोय करणे तुम्हाला जमत नसेल तर मग रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असोत किंवा कोणीही मंत्री असो त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या तरुणांना आधी नोकऱया द्या आणि नंतरच बुलेट ट्रेनच्या भाकडकथा ऐकवा असेही त्यांनी सुनावले.

जनतेचे पैसे उद्योगपतींना देण्याचा सरकारचा घाट

बडय़ा उद्योगपतींनी देशाच्या बँका बुडवल्या असे सांगतानाच आता नोटाबंदीत बँकांमध्ये जमा झालेला सामान्यांचा पैसा पुन्हा त्या उद्योगपतींना कर्ज म्हणून देण्याचा घाट सरकारने घातला आहे. तसे झाल्यास पुढच्या पाच वर्षांत आपल्या देशाच्या हातात भिकेचे कटोरे येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आयकर मर्यादा 5 लाख हवी होती

अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख हवी होती आणि आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवणाऱया ज्येष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरही वाढवला पाहिजे होता असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या खासदारांनी तशा मागण्यांचे पत्र अर्थमंत्र्यांना आधीच दिले होते, असेही ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या