बारावीनंतर बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. बीएमएस प्रवेशासाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या एफवाय प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर होण्याची वेळ आली तरी या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सीईटीचा निकाल लागून प्रवेश कधी सुरू होणार या चिंतेत विद्यार्थी आहेत.
मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात यंदापासून सुरू होणाऱया बीएमएस अभ्यासक्रमाच्या नावात बदल करून बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) असे केले आहे. या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांना ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (एआयसीटीई) मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. एआयसीटीईच्या परवानगीने बीएमएस अभ्यासक्रम राबविला जाणार असून याच्या प्रवेशासाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन्ही अभ्यासक्रम एकसमान आहेत. पण त्यासाठीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळी आहे. मात्र हे प्रवेश कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
अनिल देसाई यांचे एआयसीटीईला पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी एआयसीटीईचे संचालक प्रा. टी.जी. सीताराम यांना याप्रकरणी पत्र लिहिले असून बीएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. बीएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या गोंधळाबाबत युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी खासदार अनिल देसाई यांच्याकडे एआयसीटीईकडे पत्रव्यवहार करून तोडगा काढण्याची मागणी केली होती.