रेल्वे, म्हाडा, मेट्रोला धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज नाही

13

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वे, म्हाडा, मेट्रो, बेस्टसह नऊ प्राधिकरणांना पालिकेने धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी तीन वर्षांची स्थायी परवानगी दिली आहे. यामुळे आता धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागण्याची गरज राहणार नाही. यामुळे झाडे पडून होणाऱया दुर्घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबईत पावसाळ्यात अनेक वेळा झाडे किंवा झाडाच्या फांद्या पडून जीवित-वित्तहानी होण्याच्या घटना घडतात. रेल्वेच्या वीजवाहिनीकर किंवा रुळांवर, वीज वितरण कंपन्यांच्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या किंवा विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या घटना घडतात. यामुळे सार्वजनिक सेवांवर प्रतिकूल परिणाम होऊन नागरिकांना त्याचा त्रास होतो. मात्र झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे अनिवार्य असते. यामध्ये बराच वेळ गेल्याने दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने महत्त्वाकांक्षी निर्णय घेताना रेल्वे, बेस्ट उपक्रम, मेट्रो, मोनोरेल, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, टाटा पॉवर व रिलायन्स एनर्जी अशा नऊ संस्थांना त्यांच्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्याची ‘स्थायी परवानगी’ (स्टँडिंग परमिशन) पुढील तीन वर्षांसाठी देण्यात आली आहे.

दर तीन महिन्यांनी अहवाल द्यावा लागणार
पालिकेची परवानगी घ्यावी लागणार नसली तरी फांद्या छाटताना झाडांना किंवा झाडाच्या संतुलनाला धोका पोहचणार नाही याची खबरदारी घेऊन शास्त्रोक्त पद्धतीनेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक राहणार आहे. तसेच फांद्या कापण्यापूर्वी व कापल्यानंतर झाडाची छायाचित्रे घेऊन सर्व अहवाल दर तीन महिन्यांनी पालिकेकडे सादर करणे बंधनकारक राहणार असल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या