पाण्याअभावी पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

131

सामना प्रतिनिधी । साक्री

पावसाचा पत्ता नाही… त्यात विजेचा लपंडाव…लोडशेडिंगमुळे आठवड्यातील तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री विद्युतपुरवठा… रात्रीच्या वेळी पंपाद्वारे पिकांना पाणी द्यायचे म्हटल्यास श्वापदांची भीती… वाढलेल्या पिकांमधून रात्रीच्या दरम्यान जंगली श्वापद हल्ला करत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पाऊस नाही, दिवसभर वीज गायब आणि श्वापदांचे हल्ले यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. पिके वाचविण्यासाठी रात्रीऐवजी दिवसा विद्युतपुरवठा करण्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

तालुक्यात या वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. कोरडवाहू पिकांचे उत्पादन हातातून गेल्यातच जमा आहे. या वर्षी पूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये जेमतेम झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र गेल्या महिनाभरापासून ढगाळ वातावरण खेरीज पावसाच्या सरी पडल्या नाहीत. पिके कोमेजली. कोरडवाहू क्षेत्रातील पिके कशीबशी तग धरून उभी आहेत. त्यामुळे उत्पन्नाची शाश्वती शेतकऱ्यांना नाह़ी बागायती क्षेत्रात कसदार जमिनी असल्यामुळे पिके तग धरून उभी आहेत. तिथे पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने काढता यावे यासाठी शेतकरी जिवाचे रान करून रात्री-अपरात्री शेतातल्या विहिरीतील पाणी विद्युत पंपाद्वारे पिकांना देण्याच्या तयारीत आहेत. मात्र लोडशेडिंगमुळे आठवड्यातील तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री विद्युतपुरवठा होत आहे. त्यात श्वापदांचा धुमाकूळ…

हमखास पिकांचे उत्पादन येणार याची खात्री असूनही शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या भीतीपोटी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी पिकांपासून मिळणारे उत्पन्न गमावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपासाठी असलेली लोडशेडिंग बंद करून दिवसा सुरळीत विद्युतपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या गावांमध्ये श्वापदांचा धुमाकूळ
तालुक्यातील म्हसदी, धमनार, चिंचखेडे, बेहेड, प्रतापपूर, उंबरे, उंभरटी, कासारे, मालापूर, शेणपूर, मलांजन, साक्री या परिसरात जंगली श्वापदांचा धुमाकूळ वाढला आहे. जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्याने तसेच शिकारीसाठी श्वापदे रात्रीची शेत शिवारात फिरत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

मोठय़ा प्रमाणात मका, बाजरी
खरीपातील उत्पादनासाठी शासनाने हमीभावाची तरतूद केल्यामुळे या वर्षी तालुक्यात मका व बाजरी पिकाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. भुईमुगाची पेरणी फारच कमी प्रमाणात आढळत आहे. मका व बाजरी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली असल्याने व पिकांची वाढ चांगली झाल्यामुळे जंगली जनावरांना लपण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे, मात्र त्यांची ही सोय शेतकऱ्यांना घातक ठरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या