लातूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात, सोयाबीन उत्पादनात मोठी घट येणार

सामना प्रतिनिधी । लातूर

देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे. परंतू यावर्षी सोयाबिन उत्पादक शेतकरी थेट आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. हिरवेगार झाड दिसत असले तरी शेंगा वाळून गेलेल्या आहेत. खरीप पेरणीसाठी केलेला खर्चही भरुन निघणे शक्य नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तातडीने या संदर्भात शासनाने कांही तरी निर्णय घेणे आवश्यक आहे अन्यथा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लातूर जिल्ह्यातील शेतीचा अभ्यास करुन या भागात नेमकी कोणती पिकपध्दती घेण्यात आली पाहिजे याविषयाी मार्गदर्शन करण्यात आले पाहिजे. मागील कांही वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ, नापिकी, पिकांवर पडणारा रोग यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. अनेकजण शेतीच विक्री करत आहेत पंरतु सध्या शेती खरेदी करण्यासाठीही कुणी धजावत नाही. लातूर जिल्ह्यात सोयाबीनची लागवड मोठी आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यावेळी उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

मृग नक्षत्राच्या प्रारंभी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शेतकरीवर्ग सुखावला आणि त्याने थेट चाड्यावर मुठ धरली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि पाऊस अशी दोन्ही कारणे होती. त्यानंतर पाऊस सुरु झाला. पिकांसाठी योग्य वाटणारा पाऊस झाला असे वाटत असताना आवश्यकता असताना पाऊस झाला नाही. सध्या सोयाबीन हिरवेगार दिसत आहे, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू थेट शेगा वाळून जात आहेत. जमिनीत ओलावा राहिलेला नाही. त्यातच सोयाबीनच्या शेंगा वाळून गेलेल्या आहेत.

पेरणीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, त्यातून वर्षभर घरखर्च कसा निभावणार ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जोडजवळा येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेंगा वाळून गेलेल्या पाहूनच खचून जाऊन आत्महत्या केली. केवळ शेतकऱ्यांना आर्थीक मदत करुन भागणार नाही तर या भागातील शेतकरी कायमस्वरुपी दुष्काळाच्या तावडीतून सुटला पाहिजे यासाठी दिर्घकालीन योजना राबवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक पिकपध्दती बदलून पिक पध्दतीसंदर्भातील मार्गदर्शन गावागावात करण्याची आवश्यकता आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या