खादीसाठी महात्मा गांधीचाच फोटो वापरावा असा कोणताही नियम नाही-भाजपा

41

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. याबाबत भाजपावर आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जबरदस्त टीका व्हायला लागली आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपाने म्हटलंय की खादी ग्रामोद्योग आयोगाचा असा कोणताही नियम नाहीये की कॅलेंडरवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो वापरला पाहीजे.

याबाबत भाजपाच्या संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती ज्यामध्ये त्यांनी दावा केला की मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर खादीची विक्री ५ पटीने वाढली. महात्मा गांधी हे खादी च्या वापर आणि प्रसाराचा आत्मा आहेत, त्यांच्याच दिशानिर्देशानुसार खादी ग्रामोद्योगाचं काम होत असतं.

भाजपाने या पत्रकार परिषदेशिवाय समाजमाध्यमांवर देखील आपली बाजू मांडायला सुरूवात केली आहे. ट्विटरवर त्यांनी पोस्टर प्रदर्शित केली आहेत ज्यात दाखवलं आहे की याआधी ७ वेळा कॅलेंडरवर महात्मा गांधींचा फोटो वापरला नव्हता.

भाजपाच्या या स्पष्टीकरणानंतरही विरोधक समाधानी झालेले नाहीयेत. त्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी या वादात उडी मारत काही दिवसात नोटेवरूनही गांधी गायब होतील असं म्हटलंय. त्यामुळे भाजपासमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या