होळी आली तरी बेस्टच्या कामगारांना पगार नाही

32

सामना ऑनलाईन, मुंबई

होळी तोंडावर आली तरीही बेस्ट कामगारांना पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कामगारांनी वडाळा डेपोत आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली. बेस्टची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत असून बेस्ट प्रशासनाला आता कामगारांना पगार देणेही जड जात असल्याची कबुली बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिली.

कामगारांना फेब्रुवारी महिन्याचा पगार मार्चच्या १ ते ३ तारखेपर्यंत मिळायला हवे होते. दर महिन्याला बेस्ट ३ तारखेपर्यंत पगार त्यांच्या खात्यात वळता करते, परंतु यावेळी १० मार्च उजाडला तरीही त्यांना पगार मिळालेला नाही. त्यात मार्च महिन्यात होळीचा सण आल्याने घर चालवणे आणि सणाला खरेदी करण्यात कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. होळीनिमित्त अनेक चाकरमानी आपल्या गावीही जातात. पगार झाला नसल्यामुळे आपल्या गावी होळीचा सण दणक्यात कसा साजरा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे वडाळा डेपोतील कामगारांनी शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. दरम्यान, कामगारांना १५ मार्चपर्यंत पगार देण्यात येईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले. आर्थिक तंगीमुळे कामगारांना पगार देण्यास विलंब झाल्याची कबुलीही त्यांनी दिली, परंतु १५ मार्चपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कामगारांना पगार दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

१०० कोटी रुपयांची थकबाकी

टाटाकडून अविरतपणे होत असलेल्या वीजपुरवठय़ाबद्दल बेस्टकडून टाटाला तब्बल १०० कोटी रुपये देणे बाकी आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर कर्मचाऱयांच्या पगाराचा प्रश्न सुटेल असे जगदीश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, बेस्टला महिन्याला ४५ हजार कामगारांना पगारापोटी तब्बल १८० कोटी रुपये अदा करावे लागतात. तसेच सरकारला कराच्या स्वरूपात देण्यात येणारी रक्कमही बेस्टला भरावी लागते. या सर्व अडचणींमुळे पगार देण्यात विलंब झाल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या