सब राम भरोसे! लसीकरण कधी पूर्ण होईल, माहीत नाही; केंद्र सरकारची लोकसभेत कबुली

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी अपेक्षित लसीचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे हिंदुस्थानींचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगता येत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. कोरोना लसीकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी लेखी उत्तर देताना केंद्र सरकारने हिंदुस्थानींना राम भरोसे सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण सोडले तर बाकी सर्व वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. मात्र देशातील सर्वच लोकांचे लसीकरण होण्यासाठी जेवढी लस उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढी उपलब्ध होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

आश्वासन 215 कोटींचेप्रत्यक्षात 135 कोटी डोस

देशभर लसीकरण सुरू झाले असले तरी सर्व वयोगटासाठी लस उपलब्ध होत नाही. मुंबईत तर आठवडय़ातून लसीअभावी दोन-तीनदा लसीकरणाला ब्रेक घ्यावा लागतोय. त्यातच ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांत देशवासीयांना 215 कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते, मात्र आज लोकसभेत लेखी उत्तरात ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांत केवळ 135 कोटी डोस उपलब्ध होतील, अशी कबुली दिली. दरम्यान, देशभरात आतापर्यंत 42 कोटी 34 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या