सात हजार कुटुंबे बसतात उघड्यावर

27

कळवा, मुंब्रा, दिवा…ठाणे पल्ल्याआड हगणदारी जोरात
ठाणे- मुंबई शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचा अहवाल मुंबई महापालिकेने सादर केला असतानाच स्मार्ट सिटीकडे झेप घेणार्‍या ठाण्यात मात्र तब्बल सात हजार कुटुंबे अजूनही नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत उघड्यावर बसणार्‍यांची संख्या दुप्पटीने कमी झाली असल्याचा दावा पालिका प्रशासन करत असली तरी ठाणे पल्ल्याआड असलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा यांसारख्या भागांमध्ये हगणदारी जोरात असल्याचे चित्र आहे.

एकीकडे उभ्या राहणार्‍या टोलेजंग इमारती तर दुसरीकडे झोपडपट्ट्यांचे वाढते साम्राज्य ठाण्यात पसरत आहे. विशेषत: कळवा, मुंब्रा भागामध्ये झोपड्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. वाढत्या झोपडपट्टींच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी पडत असल्यानेच ठाणेपल्ल्याआड हगणदारी जोरात असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पालिका क्षेत्रात सुमारे १० हजार २४८ सिटस्ची १ हजार ४०१ सार्वजनकि शौचालये आहेत. त्यापैकी ९४५ सुलभ सार्वजनिक शौचालये असून ७ हजार १३५ शौचालये निर्मल भारत अभियान उपक्रमांतर्गत महापालिकेने बांधली आहे, मात्र तरीही ६ हजार ९६८ कुटुंबांवर उघड्यावर बसावे लागत आहे.

दीड हजार सीटस्ची शौचालये
ठाणे शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार १५०० सिटस्ची सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहे. त्यापैकी २०० सिटस्चे महिलांसाठी स्वतंत्र शौचालये असणार आहेत. तर स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठीही प्राधान्य देण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयांसाठी आतापर्यंत २६ हजार अर्ज आले असून त्यापैकी केवळ ४ हजार ७९६ जणांना मंजुरी देण्यात आली आहे.

हगणदारीमुक्तीच्या प्रचारासाठी सहा लाख
शासनाकडून मिळालेल्या ७ कोटी ९७ लाख ९४ हजार निधीपैकी ४३ हजार १८ लाभार्थ्यांना ५ कोटी ८५ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे एकूण खर्चापैकी ६ लाख १८ हजार रुपये हगणदारीमुक्त ठाण्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी करण्यात आला आहे.

– प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०११ मध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची संख्या ११ हजार ८४९ होती. २०१५ मध्ये ही संख्या ४८८१ ने कमी झाली.

– बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयांची संख्या- ४७९२

– बांधकाम सुरू असलेल्या शौचालयांची संख्या- १८५

– २०११ ते २०१६ पर्यंत बांधण्यात आलेली शौचालये- ४७९२

– गेल्या दोन वर्षांत बांधण्यात आलेली शौचालये- ८८७

– प्रस्तावित सामुदायिक शौचालयांची संख्या- २८०

आपली प्रतिक्रिया द्या