गोदावरी नदीवरील 11 बंधाऱ्यात ठणठणाट, ‘विष्णुपुरी’ला पाणी पोहचण्यास लागणार 45 तास

825

देवानंद गरड । संभाजीनगर

नगर, नाशिक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीनंतर या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहचला आहे. या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नदीवर एकूण 11 बंधारे कोरडेठाक असून जायकवाडी धरणातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग केल्यास हे पाणी नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पोहचण्यास तब्बल 45 तास लागतील, असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

राज्याच्या विविध भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पावसाने हाहाकार उडाला आहे. या जिल्ह्यांवर महापुराचे संकट ओढवले आहे. असे असले तरीही मराठवाडा विभागावर वरुणराजाची वकृदृष्टी कायम आहे. त्यामुळेच शासनाने संभाजीनगरसह मराठवाडा विभागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या तरी पाऊस नसल्याने विभागातील धरणे कोरडीठाक आहेत. त्यामुळे येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, जायकवाडी धरणात आलेले पाणी हे नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून करण्यात आलेल्या विसर्गाचे संचित आहे.

संभाजीनगरसह मराठवाडा विभागात पाऊस नसताना आज जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 88.50 टक्क्यांवर पोहचला आहे. मुळा, ओझर, निळवंडे, भंडारदरा, नांदुर मधमेश्वर अशा विविध वरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 33 हजार 916 क्युसेक आहे. जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा 2654.973 दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा 1916.867 दलघमी आहे. या धरणाची पाणी पातळी पुâटात 1519.82 आणि मीटरमध्ये 463.242 दलघमी आहे. पाण्याची टक्केवारी 88.39 आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. आज सोमवारी सकाळी 9 वाजेपासून जल विद्युत केंद्रातून 1589 दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढली, वरती जोरादार वृष्टी झाल्यास जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

संभाजीनगर ते नांदेड यादरम्यान गोदावरी नदीपात्रावर एकूण 11 बंधारे आहेत. या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ही 324.774 दलघमी असून आज हे सर्व बंधारे कोरडे आहेत. या बंधाऱ्यात उपयुक्त पाणीसाठा 0.940 दलघमी असून त्याची टक्केवारी 0.29 आहे. जायकवाडी धरणातून पूर्ण क्षमतेने म्हणजे 90 हजार क्युसेकप्रमाणे पाणी सोडल्यास नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात हे पाणी पोहचण्यास सरासरी 45 तास लागतील, असा अंदाज अधिकृत सूत्रांनी व्यक्त केला आहे. पूर्ण क्षमतेने पाणी सुटल्यास गोदावरी नदीकाठची सुमारे 200 गावे बाधित होण्याची शक्यता असून तितक्याच गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रात पाण्याचा आज सोमवारपासून 1589 क्युसेकप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्या आला असून अधिकचे पाणी सोडण्यात आल्यानंतर पैठण, आपेगाव, कावसान, नायगाव, वडवाळी, तेलवाडी, दांडेगाव जहाँगीर, वाघाडी, आकाळी अंबड, पाटेगाव, कनकवाडी आणि आवडे उंचेगाव आदी गावांना बाधा पोहचणार असून नायगाव, वडवाळी, वाघाडी, टाकळी अंबड आणि नवगावची दळणवळण व्यवस्था खंडित होणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याने जिल्हा प्रशासनास याबाबत सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या