शहरासह औद्योगिक वसाहतीवर पाणीसंकट, दारणा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी

26

सामना ऑनलाईन, सिन्नर

सिन्नर शहर व उपनगरातील पाण्याचे संकट अधिक गहिरे झाले असून शहरास ओद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातील पाणी साठा संपत आला आहे. सिन्नर शहरासह माळेगाव व मुसळगाव येथील ओद्योगिक वसाहतींना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान दारणा नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण डगळे, मुसळगाव ओद्योगिक वसाहतीचे चेअरमन अविनाश तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सिन्नर शहरासह माळेगाव व मुसळगाव येथील ओद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात तीन-चार दिवसांनी होणार पाणीपुरवठा आठ आठ दिवस उलटूनही होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सिन्नर नगरपालिकेसह माळेगाव व मुसळगाव येथील ओद्योगिक वसाहती चेहडी येथील इनटेकवेल जवळून पाणी उचलतात. या ठिकाणी पाणी संपुष्ठात आल्याने हे पाइप उघडे पडल्याने पाणी उचलणे बंद झाले असून येथील पाणी उपसा बंद पडल्याने पाण्याअभावी शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले आहे.

दारणा नदीला आवर्तन सोडल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणे अशक्य असून आवर्तन लांबल्यास शहरासह दोन्ही ओद्यागिक वसाहती, चेहडी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आल्याने सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.चेहडी बंधाऱ्यातून सिन्नर, नगरपालिका, नायगाव योजना, भगूर, देवळाली गावच्या पाणीपुरवठा योजना दारणा नदीवरील बंधाऱयातून राबविण्यात आल्या आहेत. येथूनच पाणी उचलले जाते. त्यामुळे पाणीसाठा संपुष्टात आल्याने सर्वच योजना अडचणीत आल्या आहेत.

शहर व परिसरात दोन ओद्योगिक वसाहती असून पाण्याअभावी कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ओद्योगिक परिसरात पाच हजार लिटरचा टँकर पाचशे रुपयांना मिळत होता तर दहा हजार लिटरचा पाण्याचा टँकर एक हजार रुपयांना मिळत होता. आता हे दर दुप्पट झाल्यामुळे पाणी पैसे देऊनही मिळेनासे झाल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

२ मुसळगाव ओद्योगिक वसाहतीस दररोज १७ ते १८ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून आता फक्त एक ते दोन लाख लिटर पाणी मिळत असून ओद्योगिक क्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित दारणेला आवर्तन सोडावे यासाठी आमचे शिष्ट मंडळ जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटणार आहे.

– कमलाकर पोटे, व्यवस्थापक, सिन्नर तालुका ओद्योगिक सहकारी वसाहत मुसळगाव.

आपली प्रतिक्रिया द्या