केंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ मोहिमेला केंद्रीय यंत्रणांनीच हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय सार्कजनिक क्षेत्रातील सात उपक्रमांद्वारे शाळांसाठी बांधण्यात आलेल्या 72 टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही. 33 टक्के शौचालय हे उपयोगात नाहीत तर 55 टक्के ठिकाणी हात धुण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’च्या अहवालात उघडकीस आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी सर्व शाळांमध्ये एका वर्षाच्या आत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असावेत अशी घोषणा केली होती. ‘स्वच्छ विद्यालय अभियान’ या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे (सीपीएसई) 1,40,997 शौचालये बांधण्यात आली. केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱया एनपीटीसी, पीजीसीआयएल, एनएचपीसी, पीएफसी, आरईसी, ओएनजीसी आणि सीआयएल यात सात उपक्रमांद्वारे 2162.60 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या 1,30,703 शौचालयांच्या कामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचे आढळून आल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘कॅग’च्या सर्वेक्षणात 2,326 शौचालयांपैकी (691) उपयोगात नाहीत. प्रामुख्याने वाहते पाणी नसणे, स्वच्छता व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतागृहांचे नुकसान आणि इतर कारणांमुळे शौचालय लॉक केले होते. ऑडिटमध्ये कोल इंडिया लिमिटेडने केलेल्या 1,119 शौचालयांपैकी ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये 14 टक्के अर्धवट बांधलले आढळले, तर एनटीपीसीने बांधलेल्या 464 शौचालयांपैकी 17 टक्के शौचालये अर्धवट बांधलेली होती. एकंदर सर्वेक्षणात 72 टक्के शौचालयात पाणी नाही. 33 टक्के शौचालय उपयोगात नव्हते तर 55 टक्के ठिकाणी हात धुण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

सर्वेक्षणातून पुढे आलेले धक्कादायक वास्तव

 ‘स्वच्छ विद्यालय अभियान’ या अंतर्गत सात केंद्रीय सार्कजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे बांधलेल्या 2,612 शौचालयांचे सर्वेक्षण केले असता 200 शौचालये बांधलेली आढळली नाहीत.

86 शौचालये अर्धवट बांधली असल्याचे आढळून आले. कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या एकूण शौचालयांपैकी 11 टक्के शौचालयं अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले.

1967 सहकारी शाळांपैकी 99 शाळांमध्ये स्वच्छतागृहे सुरू नव्हती. तर 436 मध्ये केवळ एकच शौचालय वापरात होते. या 535 शाळांत मुले व मुलींसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या