शौचालयात पाणी नाही, सीटवर रोखून बसलोय; काय करू? प्रवाशाची रेल्वेकडे तक्रार, मिळालं ‘हे’ उत्तर

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सीटखाली पडलेला कचरा, बंद पडलेले फॅन, गळणारे एसी, खराब बेडशीट यासह रेल्वेतील अस्वच्छता हा मुद्दा अग्रगण्य असतो. याची तक्रार प्रवासी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. असेच एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरूण (@ArunAru77446229) नावाच्या एका प्रवाशाने ट्विट करत रेल्वेकडे तक्रार केली आहे. रेल्वेतील शौचालयामध्ये पाणी येत नसल्याने आपण सीटवरच रोखून बसल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या या तक्रारीवर रेल्वेने उत्तर दिले असून लोकांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“मी पद्मावत एक्सप्रेस (14207) मधून प्रवास करत आहे. पण रेल्वेतील शौचालयामध्ये पाणी येत नाहीय. ट्रेनही 2 तास उशिराने धावत आहे. त्यामुळे सीटवर रोखून बसलो आहे. आता मी काय करू?” असे ट्विट अरुण यांनी केले आहे. या व्यक्तीच्या ट्विटवर यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अरुणच्या या ट्विटवर रेल्वेने उत्तर देत, झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच “आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्यासोबत प्रवासाचे तपशील (PNR/UTS नंबर) आणि मोबाईल नंबर वैकल्पिकरित्या DM द्वारे शेअर करा. जलद निवारणासाठी तुम्ही तुमची तक्रार थेट https://railmadad.indianrailways.gov.in वर नोंदवू शकता.” असे उत्तर दिले. त्यानंतर अरूण यांनी आणखी एक ट्विट करत रेल्वेचे आभार मानले आहेत.

‘सेल्फ मेड सेलिब्रिटी’

अरुणचे हे तक्रारदार ट्विट काही वेळातच व्हायरल झाले. त्याच्या या ट्विटवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अरुणचे ट्विटरवर केवळ 19 फॉलोअर्स जरी असले तरी त्याच्या या ट्विटला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी कमी वेळात व्हायरल झाल्यामुळे त्याला सेल्फ मेड सेलिब्रिटी असे म्हटले.