गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण ! जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ, खारमध्ये पाणी तुंबणार नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले सांताक्रुझ येथील गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून या वर्षीच्या पावसाळय़ात ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि खार परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे.

अतिवृष्टी झाल्यास मुंबईच्या सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार वाढू लागल्याने पालिकेने पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी पंपिंग स्टेशन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आठ ठिकाणी हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार असून यापैकी क्लिव्हलॅण्ड, हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया या ठिकाणी पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत, तर आता सहावे गझदरबंध पंपिंग स्टेशन सुरू होणार असल्यामुळे संबंधित परिसरातील पाणी साचण्यातून सुटका होणार आहे.

असे होते काम
पंपिंग स्टेशनवर संबंधित परिसरातील पाणी टँकसदृश भागात एकत्र आणले जाते. हे पाणी पंपिंग स्टेशनमधील पंपांच्या सहाय्याने वेगाने थेट समुद्रात सोडले जाते. यामध्ये प्रतिसेकंद हजारो लिटर पाणी एका पंपाच्या सहाय्याने समुद्रात फेकले जाते. यामुळे जोरदार पाऊस सुरू असताना पाणी साचत नाही.

मुंबईकरांसाठी चांगली बातमी
गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईकरांसाठी चांगली बातमी असल्याचे ट्विट शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘गझदरबंध पंपिंग स्टेशन आता पूर्णतः वापरासाठी सज्ज झाले आहे. या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पश्चिम उपनगरात साचणारे पाणी आपण समुद्रात लवकरच टाकू शकणार आहोत,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

म्हणूनच रखडले होते काम
गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम मुदतीत काम न झाल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड ठोठाकला. हे पंपिंग स्टेशन 31 मेपर्यंत कार्यान्कित केले जाईल असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर पावसाच्या पार्श्वभूमीकर 9 जूनची डेडलाइनही दिली, मात्र यावेळीही गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले नाही.

कार्यान्कित झालेले पंपिंग स्टेशन्स खर्च
हाजी अली पंपिंग स्टेशन – 100 कोटी
इर्ला पंपिंग स्टेशन – 90 कोटी
लव्हग्रोव्हपंपिंग स्टेशन – 102 कोटी
क्लिव्हलॅण्ड बंदर पंपिंग स्टेशन – 116 कोटी
ब्रिटानिया पंपिंग स्टेशन – 120 कोटी
गझदर पंपिंग स्टेशन – 125 कोटी

आपली प्रतिक्रिया द्या