
केडगाव, कायनेटिक चौक प्रभाग 17 मधील परिसरात सहा महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, मागील 11 दिवसांपासून नळ व टँकरद्वारे मिळणारे पाणीदेखील बंद झाले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी (दि. 24) महापालिकेत माठ फोडून आंदोलन केले. महिलांनी रिकामे हंडे वाजवत आयुक्तांना घेराव घालून तातडीने पाणी मिळण्याची मागणी केली.
केडगाव, कायनेटिक चौक परिसराच्या प्रभाग क्रमांक 17 मधील रविश कॉलनी, सारस कॉलनी, प्रियंका कॉलनी, आव्हाड वीटभट्टी, छायानगर, लक्ष्मीकृपानगर, अजय गॅस गोडाऊनमागील परिसर, इंदिरानगर, विद्यानगर, हनुमाननगर, सुखकर्ता कॉलनी, सुभद्रानगर, डिंमळे मळा या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मागील 11 दिवसांपासून नळाद्वारे व टँकरद्वारे पाणी मिळाले नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. या भागातील पाण्याच्या प्रश्नाबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील महापालिका प्रशासनाच्या वतीने त्याची दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नळाद्वारे पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी येत नाही, ‘फेज-2’ची पाइपलाइन घरापर्यंत जोडली. मात्र, त्यातून पाणी कधी येणार? पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते. लहान मुले दूषित पाण्याने आजारी पडत आहेत. संबंधित अधिकाऱयांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. स्थानिक ठिकाणच्या हॉटेलला पूर्ण दाबाने पाणी, मात्र नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर केली.
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘रास्ता रोको’
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे परिमल निकम यांना बोलावून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. या भागातील नागरिकांसाठी दोन टँकर वाढवून देण्याचे व पाण्याचे टँकर त्वरित पाठविण्याचे आणि 15 दिवसांत ‘फेज-2’ची पाइपलाइन सुरू करून देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या परिसरातील पाणीपुरवठा 15 दिवसांत सुरळीत न झाल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.