नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉ. मुहम्मद युनूस यांनी गुरुवारी बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. 84 वर्षीय युनूस यांना राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राष्ट्रपती भवनात ‘बंगभवन’ येथे एका समारंभात पदाची शपथ दिली. मी घटनेतील तत्त्वांचे पालन, संरक्षण करीन आणि माझी कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाड़ीन, अशी शपथ त्यांनी आज घेतली.
डॉ. युनुस यांना ग्रामीण बँकांच्या माध्यमातून कर्ज आणि वित्तपुरवठय़ाविषयीच्या कार्यासाठी 2006 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेलने गौरवण्यात आले होते.
बिहारमध्ये घुसणाऱ्या दीड हजार बांगलादेशींना बीएसएफने रोखले
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि मोठी राजकीय उलथापालथ झाल्यामुळे तेथील मोठय़ा संख्येने नागरिक शेजारील देशांमध्ये घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे. आज बिहारमध्ये घुसखोरी करणाऱ्या तब्बल दीड हजार बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलाने रोखले. घुसखोरीचे वृत्त समजल्यानंतर हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर बीएसएफचे जवान अलर्ट झाले. यावेळी बांगलादेशी नागरिक आणि जवानांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
शेख हसीना यांचे पुढचे प्लॅन भारतालाच माहिती नाहीत
सध्या भारतात दिल्लीजवळील एका सुरक्षित स्थळी शेख हसीना यांचा मुक्काम आहे. तथापि, त्या कुठल्या देशात आश्रय घेणार, कुठे जाणार याबाबतचे त्यांचे पुढचे प्लॅन, नवीन माहिती भारताला त्यांनी दिलेली नाही, असे आज परराष्ट्र प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. दरम्यान, बांगलादेशात लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यावर शेख हसीना तिथे जातीलही, असे त्यांचे पुत्र जॉय यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षातील तिथल्या लोकांना, नेत्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्या तिथे जातीलच, असे जॉय म्हणाले.