मैत्रिणीला प्रेमाने घरी बोलावलं; दीर,सासरे आणि नवऱ्याच्या मदतीने खलास केलं

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील महिलेच्या हत्या प्रकरणाचं कोडं पोलिसांनी सोडवलं आहे. एक्सप्रेस-वे भागात राहणारी शशी(40 वर्षे) ही बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने पोलिसांत दिली होती. 16 जुलै रोजी तिची मैत्रीण अंजली ही तिला बोलवायला आली होती. त्यानंतर शशी घरी परतलीच नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना शशीचा मृतदेह हापूड इथल्या सिभावली भागातल्या कालव्याजवळ सापडला होता.

शशीची हत्या करण्यात आली होती, आणि तिच्या हत्येची गुंतागुंत सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रणविजय सिंह यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केल्याचं सांगितलं. अटक केलेल्यांमध्ये शशीची मैत्रिण अंजली, तिचा नवरा विरेंद्र , अंजलीचा दीर दिनेश आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे.

शशी ही व्याजाने पैसे देण्याचं काम करत होती. अंजलीने तिच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत करता येत नसल्याने आणि ते परत करायची इच्छाच नसल्याने अंजलीने शशीला ठार मारण्याचं ठरवलं होतं. यासाठी तिने कट रचला ज्यात तिने तिच्या घरच्य़ांनाही सामील करून घेतलं. शशीला घरून बोलावल्यानंतर अंजली तिला तिच्या घरी घेऊन गेली, जिथे तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या