ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

32

सामना ऑनलाईन । ठाणे

‘इफेड्रीन’ नामक ड्रग बाळगल्याप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ माफिया विकी गोस्वामीविरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. अजामीनपत्र वॉरंट असल्यामुळे ममता कुलकर्णीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट बजावले.

ठाणे पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेसवर छापा मारला होता. त्यात पोलिसांना दोन हजार कोटींच्या किंमतीची १८.५ टन ‘इफ्रेडीन’ जप्त करण्यात आलं होतं. ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेसमधून ‘इफेड्रीन’चा साठा केनियात विकी गोस्वामीच्या टोळीला पाठवला जाणार होता. पोलिसांनी या प्रकरणी दहाहून अधिक जणांना अटक केली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णीच्या वकिलाने ममताचा रेकॉर्डेड जबाब असलेला व्हिडिओ दाखवला होता. त्यात आपण निर्दोष असल्याचा दावा ममताने केला होता. ममता कुलकर्णी सध्या केनियामधील मोम्बासामध्ये राहत आहे.

तिथून तिने एका व्हिडिओ टेपमधून म्हटलं होतं, ‘मी भारतीय राज्यघटनेचा सन्मान करते. परंतु ठाणे पोलीस आणि अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनवर माझा विश्वास नाही. मी एक योगीनी असून गेल्या २० वर्षापासून अध्यात्माशी जोडले गेले आहे. मी निर्दोष असून माझ्यावर आरोप झाल्याने मी व्यथित झाले आहे. तसेच ड्रग प्रकरणात आपल्याला गोवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी तिनं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्रंही पाठवली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या