गुप्तहेरांच्या इतिहासातील “नूर”

>> प्रतीक राजूरकर

हिंदुस्थानी वंशाची गुप्तहेर नूर इनायत खान. दुसऱ्या महायुद्धात इंग्रज आणि संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यासाठी नूरची कामगिरी नेत्रदीपक ठरली. नूरचे वडील हजरत इनायत खान हिंदुस्थानातील टिपू सुल्तानच्या वंशातील होते. इनायत खान हे सुफी शिक्षक, संगीत कलावंत आणि लघु लेखन करणारे. सुफी धर्मावर प्रवचनासाठी इनायत खान जगभर प्रवास करत. नूरची आई ही अमेरिकन नागरिक. दोघांची भेट झाली ती सॅन फ्रान्सिस्कोला रामकृष्ण मिशनच्या एका कार्यक्रमात. ओरा रे बेकर व इनायत खान यांचा निकाह झाला व ओरा बेकर या अमिना बेगम झाल्या. खान दांपत्य माॅस्कोला असताना 1 जानेवारी 1914 साली नूरचा जन्म झाला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी खान कुटुंब लंडनला स्थलांतरीत झाले. 1920 साली कुटुंबाने पुन्हा फ्रान्सला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नूरचे वय 13 असतानाच तिच्या वडिलांचे हिंदुस्थानात गेले असताना निधन झाले. नूर आपल्या तीन भावंडातील सर्वात मोठी. तिने घरातील मोठे अपत्य असण्याची सगळी जबाबदारी वडीलां नंतर सांभाळली. नूर स्वतः लघु कथा लिहित असे. बाल मनोविज्ञान, संगीत, काव्य हे नूरचे आवडीचे विषय. पुढे 1939 साली नूरचे पुस्तक Twenty Jatka Tales प्रकाशित झाले.

नूर व तिच्या भावंडांवर वडिलांच्या सुफी शिक्षणाचा प्रचंड प्रभाव होता. नाझींच्या क्रौर्याला नुसता विरोध करुन चालणार नाही तर त्यासाठी सक्रिय सहभाग असणे गरजेचे असल्याची नूरची धारणा होती. दुसऱ्या महायुद्धात पुन्हा नूरचे कुटुंब फ्रान्सहून इंग्लंडला स्थायिक झाले होते. नूर स्वतः हिंदुस्थान बाहेर वाढली होती, मात्र हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हे तिच्यासाठी तितकेच महत्वाचे होते. महिला वायू दलासाठी मुलाखत देतांना मुलाखत घेणाऱ्यांना तिने आपली भूमिका स्पष्ट केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर हिंदुस्थानच्या बाजूने व इंग्रजांच्या विरोधात युध्दात सहभागी होईल असे नूरने मुलाखतकारांना स्पष्ट केल्याचे लंडन विद्यापीठाच्या डाॅ एलिझाबेथ डर्नले यांनी बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नूरच्या मते हिंदुस्थानातील नागरिकांनी या युध्दात मोठी कामगिरी करावी. जेणेकरून इंग्रज आणि हिंदुस्थानातील नागरिकांच्या मनात मैत्रीचा एक सेतू निर्माण होण्यास मदत होईल.

नोव्हेंबर 1940 साली महिला वायू दलात नूरची निवड झाली. पुढे नूरला वायरलेस प्रशिक्षण देण्यात आले. 1941 साली नूरने  स्वतः एखाद्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला. 1943 साली चर्चिल यांनी स्थापन केलेल्या विशेष कृती दल फ्रान्स विभागात नूरची नियुक्ती करण्यात आली. वायरलेस वापरणारी सांकेतिक संदेश पाठवणारी पहिली महिला गुप्तहेर म्हणून नूर नियुक्त झाली. या अगोदर कुरिअर सेवेत गुप्तहेर म्हणून महिलांची नियुक्ती होत होती. परंतु वायरलेस ऑपरेटर म्हणून नियुक्त होऊन नूरला फ्रान्सला पाठवण्यात आले. तिला गुप्तचर विभागात घेण्यासाठी विभागातील काही वरिष्ठांची तयारी नव्हती. अनेकांनी तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काहींनी नूरचे वय यासाठी फार कमी असल्याने ती या पदासाठी अयोग्य असल्याची शंका उपस्थित केली. पुढे नूरने ते सर्व खोटे ठरवले. तिच्यावर विश्वास दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना तिने खरे ठरवले. मॅडेलिना हे सांकेतिक नाव घेऊन नूर इंग्लंडला संदेश पाठवण्याचे कार्य करु लागली.

त्याकाळी गेस्टापो नामक संयुक्त राष्ट्रांच्या गुप्तहेरांना शोधणारा जर्मन अधिकाऱ्यांचा विभागाने फ्रान्स मधील संयुक्त राष्ट्रांच्या गुप्तहेरांच्या पाठीमागे ससेमिरा लावला होता. नूर फ्रान्सला रूजू झाल्यावर बहुतांशी गुप्तहेरांना अटक झाली होती. गोपनीय संदेश पाठवण्यात इंग्लंडला अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. गुप्तपणे संदेश पाठवणारी इंग्लंडने उभारलेली यंत्रणा जर्मन सैन्याने जवळजवळ उदध्वस्त केली होती. नूर या कामात कुशल होती. तिने एकट्याने दहा संदेश पाठवणाऱ्यांची जबाबदारी स्वीकारून आपले कार्य सुरूच ठेवले. नूर सतत आपला पेहराव, ठिकाणं बदलत असायची. जेणेकरून संदेश पाठवतांना तिचा ठावठिकाणा जर्मन सैन्याला कळू नये. एक हाती नूरने अनेकांची जबाबदारी सांभाळली होती. फ्रेंच भाषेवरील तिचे प्रभुत्व तिला माहिती गोळा करण्यात फार मोलाचे ठरले. त्याच कारणास्तव नूरला फ्रान्सने नियुक्त केले होते.

नूरची फ्रान्सला नियुक्ती झाली तेव्हा फ्रान्सवर नाझी सैन्याचा मोठा प्रभाव होता. इंग्लंडचे अनेक गुप्तहेर अटक झाल्याने नूरने पुन्हा फ्रान्स मधील संयुक्त राष्ट्रांच्या सैनिक आणि प्रशासनात संपर्क प्रस्थापित करण्यात यश प्राप्त केले होते. परंतु नूर जर्मन सैन्याच्या कधीही ताब्यात जाण्याची शक्यता होती. त्यासाठी तिला वरिष्ठांकडून सातत्याने परत येण्यासाठी सूचना होत्या. नूर मात्र आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने वरिष्ठांना पुन्हा नविन तुकडी उभी करण्याचे आश्वासन दिले होते त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. मात्र सतत आपले ठिकाण बदलत असतांना वेश बदलून सुध्दा संदेश पाठवण्याचे यंत्र तिला सोबत ठेवावे लागायचे. त्यासाठी एका मोठ्या सुटकेसचा वापर ती करत असे. त्यामुळे नूरचा फ्रान्स मधील वावर हा सहज लक्षवेधी ठरण्याची शक्यता अधिक होती. परंतु नूर त्याबाबत पूर्ण काळजी घेत होती. काही वेळा नूर थोडक्यात जर्मन सैन्याच्या हाती लागण्यापासून बचावली होती. माहिती अथवा संदेश घेण्यासाठी तिला अनेकदा बाहेर पडावे लागायचे. मात्र सर्व खबरदारी घेत ती नियोजित सुरक्षित स्थळी परत येण्यास यशस्वी ठरली.

जून 1943 साली फ्रान्सला नियुक्त झालेल्या नूरने अवघ्या काही दिवसात ज्या धडाडीने आणि शौर्याने आपले काम केले त्याला तोड नव्हती. मात्र चार महिन्यातच आॅक्टोबर 1943 मध्ये नूरच्या चमूतील सहकाऱ्याने विश्वासघात केला. लेखकांचे नक्की कुणी विश्वासघात केला यावर मतमतांतरं आहेत. काहींच्या मते हेनरी नावाच्या सहकाऱ्याने तर काही लेखकांनी नूरचा सहकारी असलेल्या एका गुप्तहेराची बहिण रिने गॅरीने एक लक्ष फ्रॅन्कच्या मोबदल्यात नूरचा ठावठिकाणा जर्मन अधिकाऱ्यांना दिल्याचे लिहिले आहे. ऑक्टोबर महिन्यात नूर वास्तव्यास असलेल्या घरातून जर्मन सैन्याने नूरला अटक केली. नूरने शर्थीचा प्रतिकार केला, पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. इंग्लंडला गुप्त माहिती पोचवणारी नूर बंदिस्त झाली. नूरवर आता जिवंतपणी मरणयातना भोगण्याची वेळ आली होती. आपले कर्तव्य पार पाडत असतांना अटकेची अथवा मृत्यूची टांगती तलवार नूरवर सदैव होती. मात्र त्याहून मोठे शौर्य नूरला आता दाखवायचा होता. गेस्टापो विभागातील क्रूर अधिकारी आपल्या शत्रूंचा कर्दनकाळ म्हणून कुख्यात होते. त्यांचाच अटकेत नूर होती.

नूरला राहत्या घरातून अटक झाल्याने स्वाभाविकच तिचे साहित्य सुध्दा पकडण्यात आले. नूरच्या वहितून गुप्त माहिती जर्मन सैन्याला प्राप्त झाली. जर्मन अधिकाऱ्यांनी खोटे गुप्त संदेश पाठवून इतर गुप्तहेरांना अटक करण्यात यश प्राप्त केले. नूरने नोव्हेंबर महिन्यात तुरूंगातून एकदा पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न दोन सहकाऱ्यां समवेत केला. मात्र तो अयशस्वी ठरला. नूरने अद्याप अनेक अत्याचार सहन करूनही स्वतः काहीच माहिती दिली नव्हती. त्यात अयशस्वी पलायनाचा प्रयत्न केल्यामुळे नूरला जर्मनीला नेण्यात आले. तिथल्या तुरूंगात दहा महिने नूरला साखळ्यांनी बांधून एका अतिशय लहान अंधार खोलीत बंदिस्त केले होते. मात्र नूरने कुठलीही माहिती जर्मन अधिकाऱ्यांना दिली नाही. रात्री अपरात्री तुरुंगात नूरच्या मोठ्याने रडण्याचा आवाज मात्र अंगाचा थरकाप उडवणारा होता. दहा महिने जिवंत राहील इतकेच अन्न पाणी. वस्त्र नावापुरते, शारीरिक मानसिक अत्याचार तो सुध्दा एका तीस वर्षीय तरुणीवर. संसारात रमण्याच्या वयात नूर यातनांनी विव्हळत होती. दागिने श्रृंगार करण्याच्या वयात नूरच्या अंगावर साखळदंड होते. जवळजवळ एक वर्ष नूर तुरूंगात होती. 1944 साली नूरला दुसऱ्या तुरूंगात हलवण्यात आले. अखेर नियतीने तिला मुक्त करण्याचे ठरवले कायमचे. 13 सप्टेंबर 1944 नूरला गुडघ्यावर बसवून तिच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. तिचे अखेरचे शब्द होते फ्रेंच भाषेत Liberte`! म्हणजे मुक्त करा. नूरला गोळी मारल्यावर तिचे शरीर तुरुंगातील आगीच्या भट्टीत फेकून देण्यात आले असे Spy Princess या नूरवरील पुस्तकात श्राबणी बसु यांनी लिहिले आहे. 230 पानी या पुस्तकात नूर बाबत अनेक वर्ष सखोल अभ्यास करुन लेखिकेने नूरच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. लेखिका श्राबणी बसु या नूर मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. बसुंच्या प्रयत्नांनी नूरचा पुतळा तिच्या राहत्या घराजवळ गाॅर्डन स्क्वेअर येथे बसवण्यात आला आहे. आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात नूरने केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. आपले कर्तव्य पार पाडत असतांना नूरचे धैर्य, पराक्रम, प्रामाणिकपणामुळे गुप्तहेरांच्या इतिहासातही ती “नूर” ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या